परभणीतील स्थिती : तोकड्या मनुष्यबळावर अग्निशमनचा डोलारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:41 AM2018-01-10T00:41:26+5:302018-01-10T00:41:37+5:30
आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेंतर्गत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाला मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे़ केवळ ९ कर्मचाºयांवर हा विभाग सध्या चालविला जात असून, अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेंतर्गत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाला मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे़ केवळ ९ कर्मचाºयांवर हा विभाग सध्या चालविला जात असून, अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़
अग्निशमन हा महापालिकेतील स्वतंत्र विभाग आहे़ संपूर्ण शहराबरोबरच शहराच्या परिसरात घडलेल्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी या विभागावर आहे़ अनेक वेळा एखादी मोठी घटना घडली तर तालुक्याबाहेरही जावे लागते. मात्र या विभागात कर्मचाºयांची संख्या तोकडी असल्याने अनेक समस्या निर्माण होतात़
परभणी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ त्या तुलनेत अग्निशमन दलाच्या कर्मचारी संख्येत मात्र वाढ झाली नाही़ उलट मंजूर असलेली अनेक पदेच रिक्त आहेत़ सध्या प्रभारी अधिकाºयावर या विभागाचा कारभार चालविला जात आहे. या विभागात अग्निशमन अधिकाºयासह ६७ फायरमन, १९ चालक अशा अशी पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात प्रभारी अग्निशमन अधिकारी, ३ कंत्राटी फायरमन, १ कायमस्वरुपी फायरमन, २ लिपिक, २ चालक आणि १ शिपाई एवढेच मनुष्यबळ या विभागाला उपलब्ध आहे़
नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यासाठी शहराच्या विविध भागात मनपाचे प्रभाग समिती कार्यालय सुरू करण्यात आले. प्रभाग समिती अ, ब आणि क या तीन प्रभाग समिती अंतर्गत त्या त्या भागातील नागरिकांची कामे केली जातात. असे असले तरी अग्नीमशन विभाग मात्र संपूर्ण शहरासाठी एकाच ठिकाणी कार्यरत आहे़ शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन तीनही प्रभाग समितीत या विभागाचेही विकेंद्रीकरण होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. शिवाय फायरमनची संख्याही कमी असल्याने अडचणीत भर पडली आहे़ अग्नीशमन हा विभाग २४ तास कार्यरत राहणारा विभाग आहे़ त्यामुळे प्रत्येक शिफ्टला किमान सहा फायरमनची आवश्यकता भासते़ प्रत्यक्षात दोन फायरमन आणि एक वाहन चालक अशा तीनच कर्मचाºयांवर आगीच्या घटना नियंत्रित करण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे़
जानेवारी महिन्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागते़ या काळात आगीच्या घटना वाढतात़ त्यामुळे रात्री- अपरात्री या विभागातील कर्मचाºयांना सतर्क रहावे लागते. तेव्हा आणखी एक स्वतंत्र वाहन आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले तर या विभागातील अडचणी दूर होऊ शकतात. एका वाहनावर सहा फायरमन असे तीन शिफ्टमध्ये किमान १८ फायरमन उपलब्ध झाले तर शहर परिसरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते़
प्रभाग समितीनिहाय अग्निशमन
४शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता तीन प्रभाग समिती निहाय अग्निशमन विभाग कार्यरत करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ फायरमनच्या काही पदांना मंजुरीही घेण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच ही पदे भरली जातील, अशी माहिती महापालिकेच्या आस्थापना विभागातून देण्यात आली़
कायमस्वरुपी कर्मचाºयांची वानवा
येथील अग्निशमन दलात उपलब्ध असलेल्या ४ फायरमनपैकी ३ कंत्राटी स्वरुपाचे आणि १ कायमस्वरुपी कर्मचारी आहे़ विशेष म्हणजे हे चारही फायरमन प्रशिक्षित असल्याने कामकाजात दिलासा मिळत आहे़ मात्र ६३ फायरमनच्या जागा रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाºयांची धावपळ होत आहे़ फेब्रुवारी महिन्यात परभणी शहरामध्ये प्रसिद्ध उरुस भरतो़ उरुस काळात अग्निशमन दलाची एक गाडी आणि तीन कर्मचारी कायमस्वरुपी उरुसात नियुक्त केले जातात़ या काळात आगीची घटना घडली तर कर्मचाºयांना मोठी कसरत करावी लागते़
अग्निशमन वाहनांचीही आवश्यकता
परभणी येथील अग्निशमन दलामध्ये २ वॉटर टेंडर वाहने आहेत़ त्यातील एक वाहन ६ हजार लिटर क्षमतेचे तर दुसरे ३ हजार लिटर क्षमतेचे आहे़ त्याच प्रमाणे एक फोम टेंडरही उपलब्ध आहे़ या तीन वाहनांवरच संपूर्ण शहराचा कारभार चालविला जातो़ गॅस, पेट्रोल यासारख्या आगीच्या घटना घडल्यास फोम टेंडरचा वापर होतो़ शहराचा विस्तार लक्षात घेता आणखी एका अग्निशमन बंबाची आवश्यकता भासत आहे़