उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:47+5:302021-03-13T04:31:47+5:30
‘४०:६० प्रमाणपत्राची अट शिथिल करा’ परभणी : शरद पवार ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी कुशल, अकुशल (४०:६०) बाबतचे प्रमाणपत्र ...
‘४०:६० प्रमाणपत्राची अट शिथिल करा’
परभणी : शरद पवार ग्रामसमृद्ध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी कुशल, अकुशल (४०:६०) बाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेतून ही अट शिथिल करावी, अशी मागणी दत्तराव नारायण रेंगे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सुनेगाव येथे ट्रॅक्टरचे वाटप
परभणी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव सायाळा येथील रहिवासी सिद्धेश्वर सूर्यवंशी यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी विनोद भोसले, गंगाधर यादव, किरण समिंद्रे, अतिष गरड, बबनराव पवार, कृष्णा समिंद्रे आदींची उपस्थिती होती.
वांगी येथील वाळू घाटातून अवैध उत्खनन
परभणी : वांगी येथील वाळू घाटाचा लिलाव ३ कोटी २१ लाख ५९ हजार ५७६ रुपयांना झाला आहे. यासाठी ६ हजार १८४ ब्रास वाळू उपसा करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र या वाळू घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केले जात असून बिगर पावती वाळू वाहतूक केली जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी गणपत भिसे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
नाली, रस्त्याचे काम करण्याची मागणी
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीमधील नाली व रस्त्याचे काम तत्काळ करण्यात यावे. त्याचबरोबर कादरी यांचे किराणा दुकान ते आयेशा मशिदपर्यंत रस्ता व दोन्ही बाजूने रस्ता करावा, अशी मागणी लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने एका निवेदनाद्वारे १२ मार्च रोजी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वसंतराव विद्यालयात महिला दिन साजरा
परभणी : येथील वसंतराव नाईक विद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पी.आर. राठोड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एस.पी.लासीनकर, संध्या जाधव, प्रतिभा मारमवार, आर.के. पाटील, डी.यु . चौधरी यांची उपस्थिती होती.
खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी
परभणी : परभणी ते पेडगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. वाहनधारकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे २२ किमीचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे, राष्ट्रीय महामार्गांतर्गत असलेला हा रस्ता दुरुस्त करावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
रब्बी पीक कर्जाचे वाटप ठप्पच
परभणी : जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे यावर्षीही रब्बीच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे मागील आठवड्यात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना बँक प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र अद्यापही कर्ज वाटपाला गती मिळालेली नाही.
रेल्वेस्थानकावर पार्किंगचा बोजवारा
परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरात आता प्रवाशांची संख्या वाढत आहे. या प्रवाशांना स्थानकावर सोडविण्यासाठी येणारे नातेवाईक नो पार्किंगच्या जागेतच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे.