परभणी शहरातील स्थिती :महसूल विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:27 AM2018-10-06T00:27:15+5:302018-10-06T00:27:56+5:30
शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़
शहरात विविध ठिकाणी महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनी आहेत़ विशेषत: प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील जमिनीवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे़ चार वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एस़पी़ सिंह यांनी या परिसरातील अतिक्रमणे हटवून महसूलच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या़ सिंह यांची बदली झाल्यानंतर या जमिनीकडे एकाही महसूल विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष गेले नाही़ परिणामी आता या परिसरातील जमिनींवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे़ शिवाय मोकळ्या जागेवरही अतिक्रमण झाले आहे़
या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या़ त्यावेळी शिव शंकर यांनी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते; परंतु, कडवकर यांना या प्रकरणी कारवाई करण्यास वेळच मिळालेला नाही़ परिणामी या भागातील जमिनींवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहे़
शासकीय दस्ताऐवजात फेरबदलाचा प्रयत्न
आज घडीला महसूल विभागाच्या जमिनी या मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या जमिनीची बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपयांची किंमत आहे़ त्यामुळे या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे़ त्यामुळेच काहींना हाताशी धरून शासकीय दस्ताऐवजांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा शहरात होताना दिसून येत आहे़ त्यामुळे या शासकीय जमिनीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांना या प्रकरणी वैयक्तीक लक्ष घालून कारवाई करावी लागणार आहे़ अन्यथा शहरातील इतर ठिकाणच्या मनपाच्या जमिनीवर ज्या प्रकारे कब्जा करण्यात आला, तसाच काहीसा प्रकार महसूलच्या जमिनीबाबतही होण्याची शक्यता आहे़
वक्फ बोर्डाच्या जमिनीवरही अतिक्रमण
शहरात वक्फ बोर्डाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे़ या जमिनीवरही सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे़ वक्फ बोर्डाच्या औरंगाबाद येथील कार्यालयास या जमिनीकडे पाहण्यास वेळ मिळत नाही़ चार वर्षापूर्वी वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती़ परंतु, नंतर ही मोहीम बारगळली़