परभणी शहरातील स्थिती : सार्वजनिक शौचालयांना घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:55 PM2019-04-28T23:55:09+5:302019-04-28T23:56:34+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत साधारणत: दीड वर्षापूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून शहरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी बहुतांश शौचालये बंद पडल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत साधारणत: दीड वर्षापूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून शहरात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांपैकी बहुतांश शौचालये बंद पडल्याने स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे़
नागरी स्वच्छता अभियानांतर्गत परभणी शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत उपक्रम राबविण्यात आले़ शहरातील सार्वजनिक स्थळे हागणदारीमुक्त करीत विविध भागात सुमारे ६३ सार्वजनिक शौचलयांची उभारणी करण्यात आली़ प्रत्येक शौचालयांवर लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला़ शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक शौचालय उभारल्याने शहरवासियांची गैरसोय दूर होईल, असे वाटत होते़ परंतु, काही दिवसांतच यातील अनेक शौचालये बंद पडली़ शौचालयांच्या परिसरात सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती़
या सुरक्षारक्षकांचे नियमित वेतन होत नसल्याने शौचालयाच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला़ एक-एक करीत शौचालयांची बंद होण्याची मालिकाच सुरू झाली़ रविवारी शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली असता, १३ सार्वजनिक शौचालये बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले़ यापैकी काही शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे मनपाने सार्वजनिक शौचालयांवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून, नागरिकांची गैरसोयही ‘जैसे थै’ असल्याचे दिसत आहे़
महानगरपालिकेने बंद असलेले सार्वजनिक शौचालय पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी होत आहे़
ही शौचालये बंद
शहरात रविवारी केलेल्या पाहणीत फेरोज टॉकीज परिसर, निरज हॉटेल, जिंतूर रोडवरील आयटीआयसमोरील शौचालय, जिल्हा परिषदेसमोरील शौचालय, राजगोपालाचारी उद्यान, एमआयडीसी परिसरातील प्रबुद्ध नगर, खानापूर भागातील सारंगनगर, एसटी वर्कशॉपच्या पाठीमागील शौचालय, गंगाखेड रोडवरील कुक्कुटपालन परिसरातील शौचालय, लोहगाव रोड आणि खंडोबा बाजार परिसरातील शौचालय बंद असल्याचे दिसून आले़
शौचालयांना पाण्याचा फटका
४शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, मनपाने उभारलेल्या सार्वजनिक शौचालय परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने ही शौचालये बंद असल्याचे निदर्शनास आले आहे़
४विशेष म्हणजे, शौचालयांची उभारणी करतानाच त्या ठिकाणी बोअरही घेण्यात आला होता; परंतु, उन्हाळ्यात पाणीच आटल्याने शौचालये बंद पडली आहेत़ तर काही भागात शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ते शौचालय बंद असल्याचे दिसून आले़
शौचालयांची दुरवस्था
४शहरातील काही शौचालयांची दुरवस्था झाली आहे़ या शौचालयातील फरशी, नळ्याच्या तोट्या गायब झाल्या आहेत़ तर शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असल्याचे दिसत आहे़
४खानापूर भागात स्मशानभूमी परिसरात सिमेंटच्या विटा वापरून बांधलेले शौचालय बुडापासूनच उखडले आहे़ सध्या हे शौचालय बंद असल्याचे दिसून आले़
या भागातील शौचालये सुरू
रविवारी केलेल्या पाहणीत पाथरी रोड, प्रशासकीय इमारत परिसर, शनिवार बाजार, शासकीय रुग्णालय परिसर, एम.आय.डी.सी. परिसर, खानापूर फाटा परिसरातील एक, धाररोड, वांगी रोड, भीमनगर आदी भागातील सार्वजनिक शौचालये सुरू असल्याचे दिसून आले.
बांधकामापासूनच शौचालय बंद
शहरातील जिंतूर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर महापालिकेने उभारलेले सार्वजनिक शौचालय उद्घाटनापासूनच बंद आहे़ या शौचालयाचा वापरही झालेला नाही़ त्यामुळे शौचालयावर केलेला खर्च नागरिकांना सुविधा पुरवू शकला नाही़
४तसेच राजगोपालाचारी उद्यानातही शौचालयांची उभारणी करण्यात आली़ परंतु, हे शौचालयेही बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले़ नेहरू गार्डन भागातील शौचालय सुरू आहे़ परंतु, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़