परभणी जिल्ह्यातील स्थिती :११ लाख मे.टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:25 PM2019-01-15T23:25:33+5:302019-01-15T23:26:19+5:30
जिल्ह्यातील ५ खाजगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत १० लाख ८५ हजार ५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून गंगाखेड शुगर साखर कारखान्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत गाळपात आघाडी घेतली आहे. या कारखान्याने तब्बल ४ लाख ९६ हजार ६०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ५ खाजगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत १० लाख ८५ हजार ५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून गंगाखेड शुगर साखर कारखान्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत गाळपात आघाडी घेतली आहे. या कारखान्याने तब्बल ४ लाख ९६ हजार ६०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
नगर व नाशिक जिल्ह्यामध्ये २०१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण जवळपास १०० टक्के भरले होते. त्यामुळे या धरणातील पाणी गोदावरी नदीपात्रात नंतरच्या कालावधीत सोडण्यात आले. या पाण्याचा पाथरी, सोनपेठ, गंगाखेड व पालम तालुक्यांना फायदा झाला. शिवाय २०१७ मध्येच निम्न दुधना प्रकल्पही जवळपास ९० टक्के भरला होता. त्यामुळे या प्रकल्पातून दुधना नदी व डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. परिणामी शेतकºयांनी ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली. २०१७ मध्ये जिल्ह्यात फक्त ९ हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती. २०१८ मध्ये मात्र तब्बल ४५ हजार ७०० हेक्टर जमिनीवर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी सहकार क्षेत्रात जोरदार चर्चा आहे. साखर कारखान्याकडून ऊस घेऊन जाण्यात भेदभाव केला जात असल्याच्या कारणावरुन पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील शेतकरी रमेश काळे व निता रमेश काळे या दांम्पत्याने पाथरी येथील रेणुका शुगर कारखान्यात सोमवारी ठिय्या मांडला होता. सोबत विषारी द्रवाच्या बाटल्या घेऊन जोपर्यंत ऊस घेऊन जाण्याचे आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने कारखाना व्यवस्थापनाची भंबेरी उडाली होती. काळे दाम्पत्याला आठ दिवसांत ऊस घेऊन जाण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यातील उसाच्या गाळपाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता जिल्ह्यातील ५ खाजगी साखर कारखान्यांनी १० लाख ८५ हजार ५० मेट्रीक टन उसाचे गाळप केल्याची माहिती नांदेड येथील साखर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील माकणी येथील गंगाखेड शुगर कारखान्याने १ नोव्हेंबरपासून २०१८ ते १४ जानेवारी २०१९ पर्यंत तब्बल ४ लाख ९६ हजार ६०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
या कारखान्यात उसाचा १०.२५ टक्के उतारा आला आहे. त्यानंतर पूर्णा येथील बळीराजा साखर कारखान्याने १ नोव्हेंबर ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत २ लाख ८१ हजार ३८५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून येथील उसाला ११ टक्क्याचा उतारा आला आहे. परभणी तालुक्यातील त्रिधारा साखर कारखान्याने १ डिसेंबर २०१८ ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत १ लाख २५ हजार ९१० मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यात उसाचा १०.३४ टक्के उतारा आला आहे. पाथरी तालुक्यातील रेणुका शुगरने ९८ हजार ६०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यात उसाला ११.१ टक्के उतारा आला आहे. पाथरी तालुक्यातील योगेश्वरी साखर कारखान्याने २१ नोव्हेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत ८७ हजार ६०५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून या कारखान्यात उसाला १०.७२ टक्के उतारा आला आहे.
पाच कारखान्यांनी १० लाखापेक्षा अधिक मेट्रीक टन उसाचे गाळप केले असले तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. कारखान्यांचा हंगाम जवळपास मे २०१९ पर्यंत चालण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्याचे या साखर कारखान्यांसमोर आव्हान आहे. याशिवाय सेलू, मानवत या सारख्या साखर कारखाने नसलेल्या तालुक्यातील ऊसही गाळपासाठी या कारखान्यांना घेऊन जावा लागणार आहे.
शिवाय कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाºया व बाजुच्या जिल्ह्यातील ऊसही हे साखर कारखाने आतापर्यंत गाळपासाठी आणत आले आहेत. त्यामुळे त्या शेतकºयांचा ऊस गाळपाचा प्रश्नही या कारखान्यांना सोडवावा लागणार आहे.
दररोज १८ हजार २५० मेट्रिक टन उसाचे होतेय् गाळप
४जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांकडून जवळपास १८ हजार २५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले जाते.त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६ हजार मेट्रिक टन ऊस गंगाखेड शुगरकडून गाळप केला जातो. तर बळीराजा साखर कारखान्याकडून ३ हजार ५०० मेट्रिक टन ऊस गाळप केला जातो. त्रिधारा कारखान्याकडून २ हजार ५००, रेणुका शुगरकडून १२५० आणि योगेश्वर साखर कारखान्याकडून १५०० मेट्रिक टन उसाचे दररोज गाळप केले जाते.
नांदेड विभागात गंगाखेड शुगरची बाजी
नांदेड विभागात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. पाच जिल्ह्यात एकूण ३७ साखर कारखाने आहेत. त्यामध्ये चार कारखाने बंद असून ३३ कारखान्यांमध्ये उसाचे गाळप सुरु आहे. त्यापैकी १४ कारखाने सहकारी तत्वावर असून १९ खाजगी कारखाने आहेत. ऊस गाळप सुरु असलेल्या ३३ पैकी गंगाखेड शुगर कारखान्याने सर्वाधिक म्हणजे तब्बल ४ लाख ९६ हजार ६०० मेट्रीक टन उसाचे आतापर्यंत गाळप केले आहे. या कारखान्याने उसाला २ हजार ८६ रुपयांचा एफआरपी दर दिला असून शेतकºयांना उसाचा १८०० रुपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे यांनी दिली. शेतकºयांना जास्तीत जास्त लाभ देऊन त्यांच्या उसाचे गाळप करण्यास कारखाना प्रशासन कटिबद्ध आहे, असेही लटपटे म्हणाले.