परभणी जिल्ह्यातील स्थिती : रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:01 AM2018-08-05T00:01:20+5:302018-08-05T00:02:37+5:30

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.

Status in Parbhani District: Employment Guarantee Scheme | परभणी जिल्ह्यातील स्थिती : रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

परभणी जिल्ह्यातील स्थिती : रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार हमी योजना राबविली जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने राज्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली जात आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या योजनेला मजुरांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. नोंदणी केलेल्या मजुरांची संख्या १ लाखापर्यंत आहे; परंतु, प्रत्यक्षात कामे करण्यासाठी मात्र मजूर फिरकत नसल्याचे दिसत आहे.
मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात ग्रामपंचायतींची ११३ आणि यंत्रणांची ९३ अशी केवळ २२६ कामे झाली. या कामांवर ९६१ मजुरांनी काम केले. हजारो मजुरांची नोंदणी झाली असताना केवळ ९५० मजुरांनीच रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला. यावरुन मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक १०७ कामे सुरु आहेत. या कामांवर २८९ मजुरांना काम मिळाले. इतर तालुक्यांमध्ये मात्र कामांची संख्या दोन आकडीच आहे. गंगाखेड तालुक्यात १९, जिंतूर तालुक्यात ५, पालम तालुक्यात १८, परभणी १९, पूर्णा २९, सेलू २५, पाथरी तालुक्यात ४ कामे सुरु आहेत. तर सोनपेठ तालुक्यात मागील आठवड्यात रोजगार हमी योजनेतून एकही काम झाले नाही. रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत आणि यंत्रणा अशा दोन स्तरावर कामे केली जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५६० तर यंत्रणांच्या माध्यमातून ४०१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. विशेष म्हणजे, पालम, परभणी, पाथरी आणि सोनपेठ या चार तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील आठवड्यात एकही काम झाले नाही. तर जिंतूर, सेलू आणि सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून एकही काम सुरु झाले नाही. एकंदर रोहयोच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवली असून लाखो रुपयांची कामे उपलब्ध असूनही मजूर मात्र या योजनेकडे फिरकत नसल्याने प्रशासनाला कामांची संख्या आणि मजुरांची संख्या वाढविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सुरु असलेली कामे
२६ जुलै ते १ आॅगस्ट या आठवड्यातील मजूर उपस्थितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि घरकुल ही दोन कामे मोठ्या प्रमाणात झाली. तर काही ठिकाणी विहीर पुनर्भरणाची कामे करण्यात आली आहेत. तर तहसील स्तरावरुन वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तुती लागवड, फळबाग, रोपवाटिका आणि वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली. त्यातही जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून तुती लागवडीची सर्वाधिक कामे होत आहेत. रोजगार हमी योजनेतून विविध ३० प्रकारची कामे केली जातात. त्यात शेततळे, शेत रस्ते, ढाळीचे बांध, स्मशानभूमी रस्ते इ. कामांचा समावेश आहे; परंतु, प्रत्यक्षात मोजक्याच कामांना मागणी असल्याचे दिसत आहे.

Web Title: Status in Parbhani District: Employment Guarantee Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.