परभणी जिल्हा रुग्णालयातील स्थिती: एक्स-रे फिल्मचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:02 AM2018-05-23T00:02:45+5:302018-05-23T00:02:45+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्मचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने सध्या रुग्णालयात फिल्मचा तुटवडा निर्माण झाला असून फिल्म अभावी एक्स-रे मशीन बंद राहत आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात येणाºया गोरगरीब रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्मचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने सध्या रुग्णालयात फिल्मचा तुटवडा निर्माण झाला असून फिल्म अभावी एक्स-रे मशीन बंद राहत आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात येणाºया गोरगरीब रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील काना-कोपºयातून रुग्ण उपचारासाठी येतात. विशेषत: आर्थिकदृष्ट्या मागास असलेले रुग्ण कमीत कमी खर्चात उपचारा व्हावेत, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात; परंतु, मागील काही महिन्यांपासून सामान्य रुग्णालयातील उपचारासाठीही रुग्णांना खर्चाला सामोरे जावे लागत आहे. शासकीय धोरणांमुळे रुग्णांवर आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाला शासनामार्फत सर्व साहित्याचा पुरवठा केला जातो. त्यात औषधी, वेगवेगळ्या तपासणीसाठी लागणारे साहित्य शासनामार्फत मूबलक प्रमाणात उपलब्ध होणे अपेक्षित आहे; परंतु, मागील काही महिन्यांपासून यात विस्कळीतपणा आल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून सतत औषधींचा तुटवडा जाणवत आहे. मूबलक प्रमाणात औषधी उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरांना ही औषधी चिठ्ठीवर लिहून द्यावी लागते व रुग्णांना बाहेरुन औषधी विकत घ्यावी लागते.
औषधांच्या तुटवड्याबरोबरच मागील काही दिवसांपासून एक्स-रे मशीनच्या फिल्मचा तुटवडाही रुग्णालय प्रशासनाला जाणवत आहे. दोन दिवसांपासून प्रशासनाकडे या फिल्म उपलब्ध नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा एक्स-रे काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. अनेक आजारांवर एक्स-रे पाहूनच उपचार केले जातात. यात अपघातातील रुग्ण, छातीचे विकार या सारख्या रुग्णांचे एक्स- रे काढल्यानंतरच त्यांच्यावर उपचार केले जातात. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीन फिल्म अभावी बंद असल्याने रुग्णांना बाहेरुन एक्स-रे काढावा लागत आहे. एक एक्स-रे काढण्यासाठी १५० ते ४०० रुपयापर्यंतचा खर्च येतो. हा भूर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे. सामान्य रुग्णालयात दररोज सरासरी ६० ते ७० एक्स- रे काढले जातात. मात्र दोन दिवसांपासून एक्स-रे मशीनचे कामकाज ठप्प असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.
तीन महिन्यांनी होते बैठक
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामकाजा दरम्यान येणाºया अडचणींवर तोडगा काढण्यासाठी रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. दर तीन महिन्याला रुग्ण कल्याण समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत कामकाजादरम्यान येणाºया अडचणी, साहित्य खरेदी आदी विषयांच्या प्रस्तावांवर चर्चा करुन खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी घेतली जाते. परभणी जिल्ह्यात विधानपरिषदेची आचारसंहिता लागू असल्याने आतापर्यंत रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली नाही. २१ मे रोजी विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रुग्ण कल्याण समितीची बैठक घेतली जाणार असल्याचे समजते.
फिल्मची मागणी नोंदविली
रुग्णांचे एक्स-रे काढण्यासाठी मोठ्या आकाराच्या फिल्म उपलब्ध आहेत. परंतु, लहान आकाराच्या फिल्मचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपलब्ध फिल्म अत्यावश्यक बाबींचे रुग्ण तसेच कोर्ट केसेसमधील रुग्णांच्या एक्स-रे साठी राखून ठेवल्या आहेत. कोल्हापूर येथील विशाल इंटरप्रायजेसकडे फिल्मची मागणी नोंदविली आहे. शासकीय कोट्यातून फिल्म उपलब्ध होत नसल्याने खाजगी स्वरुपातून या फिल्म विकत घेतल्या जात आहेत. येत्या एक- दोन दिवसांत फिल्म उपलब्ध होतात, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
स्थानिक स्तरावरच उपाययोजना
जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्याचा पुरवठा राज्यस्तरावरुन केला जातो. औषधी आणि इतर आवश्यक ते साहित्य गरजेनुसार मागविले जाते. मागणी नोंदवूनही वेळेत पुरवठा होत नसल्याने स्थानिकस्तरावर कामकाज करताना अधिकाºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी जिल्हा नियोजन समिती अथवा इतर योजनांमधून औषधी, साहित्य खरेदी करुन उपाययोजना करावी लागत आहे. राज्य शासनाने मूबलक स्वरुपात औषधी आणि साहित्याचा नियमित पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
सिटीस्कॅनलाही लागेना मुहूर्त
सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन दोन वर्षापासून बंद असल्याने रुग्णांना सीटीस्कॅनसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत आहे. जिल्ह्यासाठी सीटीस्कॅन मशीन मंजूर झाल्याचे वर्षभरापासून सांगितले जात आहे. राज्यस्तरावरुन ही मशीन उपलब्ध होणार आहे. परंतु, अद्यापपर्यत या संदर्भात गतीने कारवाई झाली नसल्याने रुग्णांना दोन वर्षांपासून सीटीस्कॅनच्या चाचणीसाठी खाजगी रुग्णालयाची दारे ठोठवावी लागत आहेत.