परभणी जिल्ह्यातील स्थिती : आमदार आदर्श ग्रामयोजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:12 AM2018-04-12T00:12:32+5:302018-04-12T00:12:32+5:30
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेत जिल्ह्यातील पाचही आमदारांनी आदर्श गावांची निवड केली खरी़; मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षभरापासून या गावांमध्ये विकासच पोहचला नाही़ त्यामुळे इतर गावांप्रमाणेच आदर्श गावेही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेत जिल्ह्यातील पाचही आमदारांनी आदर्श गावांची निवड केली खरी़; मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे वर्षभरापासून या गावांमध्ये विकासच पोहचला नाही़ त्यामुळे इतर गावांप्रमाणेच आदर्श गावेही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत़
केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने २० मे २०१५ रोजी शासन आदेश काढून आमदार आदर्श ग्राम योजना सुरू केली़ या योजनेंतर्गत विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांनी आपल्या मतदार संघातील एक गाव निवडून त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले़ परभणी जिल्ह्यात विधानसभेचे ४ आणि विधान परिषदेचे एक आमदार असून, या पाचही आमदारांनी आपापल्या मतदार संघातील एका गावाची निवड केली़ योजनेनुसार अधिकाऱ्यांनी देखील गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करीत विकास आराखडे तयार केले़ या आराखड्यानुसार प्रत्येक गावामध्ये कामे होणे अपेक्षित होतो; परंतु, या गावांमध्ये विकास कामेच झाली नसल्याची बाब समोर आली आहे़ लोकप्रतिनिधींनी निवडलेल्या आदर्श गावाकडेही अधिकाºयांनी कानाडोळा केल्याची बाब समोर येत आहे़ आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत आमदारांनी निवडलेल्या गावांमध्ये प्रशासनातील अधिकाºयांनी जनजागृती करणे तसेच या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आराखडा तयार करणे, लोकसहभाग वाढवित गावाचा विकास साधत हे गाव आदर्श ग्राम करणे अपेक्षित होते़ शासनाच्या या योजनेंतर्गत टप्पेही ठरवून दिले होते़ पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामविकास आराखडा तयार करणे, दुसºया टप्प्यात गावात जनजागृती करणे आणि तिसºया टप्प्यात प्रत्यक्ष कामांना सुरुवात करणे असे टप्पे आहेत़ परभणी जिल्ह्यातील आदर्श गावांची काय अवस्था आहे? याचा आढावा घेतला तेव्हा अनेक गावांमध्ये योजनेच्या अनुषंगाने प्रभावी कामे झाली नसल्याचेच समोर आले आहे़ योजना राबविण्याची ज्यांच्या शिरावर जबाबदारी होती ते अधिकारीच गावातील प्रस्तावित कामे, झालेली कामे या विषयी अनभिज्ञ असल्याचेही दिसून आले़ योजनेसाठी प्रभारी अधिकारी (चार्ज आॅफीसर) नेमले आहेत़ या अधिकाºयांकडे योजनेच्या कामांविषयी सर्व संबंधितांकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी आहे़ तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचाºयांकडून कामे करून घेण्याचीही जबाबदारी प्रभारी अधिकाºयांची आहे़ मात्र प्रत्यक्षात या अधिकाºयांना गावात कोणती कामे प्रस्तावित केली, कोणती झाली याचीच माहिती नसल्याचे समोर आले आहे़ प्रत्यक्ष गावामधून विचारणा केली तेव्हा आदर्श ग्राम योजनेंतर्गत कामेच झाली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले़
अधिकाºयांवर दिली जबाबदारी
या योजनेसाठी जिल्हाधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतात़ तर जि़प़ सीईओ सहसमन्वय अधिकारी आहेत़ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांवर सहाय्यक समन्वयक अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे़ तर पं़स़चे बीडीओ किंवा नेमलेल्या सक्षम अधिकाºयांवर प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे़ हे प्रभारी अधिकारी आमदार, जिल्हाधिकारी आणि ग्रा़पं़तील दुवा म्हणून काम करतात़
आमदारांनी दिलेला निधी असा...
२०१५-१६ मध्ये आदर्श ग्राम योजनेला सुरुवात झाली़ पाचही आमदारांनी निवडलेल्या गावांमध्ये आमदार विकास निधी दिला आहे़ त्यातील काही कामे प्रस्तावितही आहेत़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी पिंगळी बाजार गावासाठी ६ लाख रुपयांचा निधी दिला आहे़ आ़ मोहन फड यांनी रामपुरी गावासाठी ३० लाखांचा निधी दिला आहे़ आ़ विजय भांबळे यांनी आडगाव बाजारसाठी ५ लाख तर आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी कासापुरी गावासाठी ७ लाख २५ हजारांचा निधी दिला आहे़ तसेच २०१७-१८ मध्ये ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्यासाठी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी ४ लाख ९७ हजारांचा निधी दिला़ त्याच प्रमाणे मानवत तालुक्यातील रामपुरी गावात आ़ शरद रणपिसे यांच्या निधीतून १५ लाख रुपयांची कामे आ़ मोहन फड यांनी मंजूर करून घेतली आहेत़ तर कासापुरी या आदर्श गावात सिमेंट रस्ता, नाली बांधकामासाठी आ़ मोहन फड यांनी ५ लाख ९९ हजार रुपयांचा निधी दिला आहे़ रामपुरीत रस्ता, नाली बांधकाम, अॅरोप्लँट, सौर दिवे यासाठी निधी वापरण्यात आल्याची माहिती मिळाली.
अपेक्षित कामे
आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, स्वच्छता शिबीर, पशू आरोग्य शिबीर, अंगणवाड्यातील बालकांची उपस्थिती, वृक्षारोपण, जनधन योजनेंतर्गत बॅकेत खाते उघडणे तसेच मनरेगा मार्फत रोजगार दिवसाचे आयोजन करणे या उपक्रमांचाही या योजनेत अंतर्भाव होता़
सर्वांगीण विकासाची संकल्पना बाजूला
आमदारांनी निवडलेल्या गावांचा विकास करताना केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता त्या गावाचा सर्वांगीण विकास साधून गावाचे परिवर्तन करावे आणि गावात झालेल्या सुधारणा पाहून इतर गावांनीही या प्रक्रियेत समाविष्ट व्हावे, असा या योजनेचा हेतू आहे़ त्यामुळे नाली बाधंकाम, सिमेंट रस्ते या पायाभूत सुविधा वगळता, शिक्षण, आरोग्य, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी असलेल्या योजना, कृषी विकास, सिंचनाच्या सुविधा, बँकींग सुविधा अशा सर्व बाजूंनी गावामध्ये कामे होणे अपेक्षित होते; परंतु, याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने आमदार आदर्श ग्राम योजना कागदावरच राहिल्याचे दिसत आहे़
अशी आहेत, निवडलेली गावे...
परभणी विधानसभा मतदार संघात आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी पिंगळी बाजार या गावाची आदर्श ग्राम म्हणून निवड केली आहे़ गंगाखेड मतदार संघात आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे यांनी पालम तालुक्यातील पेठशिवणी, पाथरी विधानसभा मतदार संघात आ़ मोहन फड यांनी रामपुरी बु़, जिंतूर मतदार संघात आ़ विजय भांबळे यांनी आडगाव बाजार तर विधान परिषदेचे आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी तालुक्यातील कासापुरी या गावांची आदर्श ग्राम म्हणून निवड केली आहे़
या गावांमध्ये योजनेप्रमाणे विकास कामे झाली नसली तरी आमदारांनी त्यांचा स्थानिक निधी वापरून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला़ मात्र प्रशासकीय स्तरावर फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड आहे़