परभणीतील स्थिती: सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा तळालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:41 AM2018-07-02T00:41:14+5:302018-07-02T00:44:54+5:30
पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: पावसाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारलेली नाही. जवळपास सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्याने तळ गाठल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.
उन्हाळ्यात प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु, त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली. आतापर्यंत केवळ दोन वेळा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसामुळे पेरणीयोग्य वातावरण तयार झाले असले तरी प्रकल्पांमधील जलसाठ्याला मात्र फायदा झाला नाही. त्यामुळे प्रकल्प पाण्याने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीला डिग्रस बंधाऱ्यात सर्वाधिक ३९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीत झरी प्रकल्पात ६१ टक्के पाणी असल्याची नोंद घेण्यात आली. मात्र या प्रकल्पामध्ये जायकवाडी प्रकल्पाचे पाणी साठविले आहे. त्यामुळे पावसामुळे अजूनही प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही.
गोदावरी नदीवर एकूण ४ बंधारे बांधले आहेत. त्यापैकी पाथरी तालुक्यातील मुद्गलच्या बंधाºयात ११.६३ टक्के, ढालेगाव बंधाºयात १२.२४ टक्के आणि गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात १०.७५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
प्रकल्पामंधील पाण्याची पातळी वाढली नसल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील दोन वर्षापासून प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने जिल्हावासियांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी असल्याने ओरड झाली नाही. परंतु, प्रकल्पांची सध्याची स्थिती लक्षात घेता आगामी काळात मूबलक पाऊस झाला नाही तर पुढील उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
१६७ मि.मी. पाऊस
१ जून ते २९ जून या काळात परभणी जिल्ह्यात १६७.४८ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत २१ टक्के आणि जून महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३३ टक्के पाऊस झाला आहे. आकडेवारीनुसार हा पाऊस समाधानकारक असला तरी प्रत्यक्षात प्रकल्पाच्या पाणीसाठ्यासाठी या पावसाचा थोडाही लाभ झाला नाही. त्यामुळे जिल्हावासियांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
ाम्न दुधना प्रकल्पात १४ टक्के पाणी
यावर्षीच्या उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक गावांची भिस्त निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर होती. उन्हाळ्यामध्ये या प्रकल्पामध्ये ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र पावसाळ्यात या प्रकल्पात केवळ १४.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पाची जीवंत पाणीसाठ्याची क्षमता २४२ दलघमी एवढी असून प्रत्यक्षात ३४ दलघमी पाणी प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी जून महिन्यामध्ये प्रकल्पामध्ये ४०.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पानेही तळ गाठल्याने चिंता वाढल्या आहेत.
‘येलदरी’त वाढेना पाणी
परभणी शहरासह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शहरांची तहान भागविणारा येलदरी प्रकल्प यावर्षीच्या उन्हाळ्यात मृतसाठ्यात गेला. त्यामुळे अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागली होती. या प्रकल्पात सध्याही शून्य टक्के पाणीसाठा आहे.