सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:59 PM2023-08-19T18:59:45+5:302023-08-19T19:00:21+5:30

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची गैरसोय 

Steering wheel for safe travel is blocked; Sometimes the door of the bus and sometimes the wheels come off! | सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात!

सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात!

googlenewsNext

- संतोष मगर
परभणी :
जिल्ह्यातील चारही आगारांत एसटी महामंडळाच्या बहुतांश बस नादुरुस्त आहेत. कधी स्टेअरिंग जाम तर, कधी चाक निखळण्याच्या घटना पुढे आल्याने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. ‘एसटीचा प्रवास, सुखी प्रवास’ अशी अपेक्षा फोल ठरत आहे. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध योजना असल्याने प्रतिसाद मिळतोय. मात्र नादुरूस्त बस आणि नियोजनाच्या अभावामुळे ९ ऑगस्टला गंगाखेडहून पालमला जाणाऱ्या बसचे चाक निखळून पडले होते. या घटनेत ६२ प्रवासी बचावले. यापूर्वी पूर्णा तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली. यातही प्रवासी बचावले होते. १९ मार्चला सायाळा पाटीवर स्टेअरिंग तुटल्याने बस पलटल्याची झाली होती. काही दिवसांपूर्वी राणीसावरगाव येथे चाक निखळले होते. चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला होता. बसचा कुठे दरवाजा निखळतो तर, कुठे ब्रेक फेल. यासह नादुरुस्त बस धावत असल्याने प्रवाशांना  अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो.   

फिटनेस सर्टिफिकेटवरही प्रश्नचिन्ह
बस नादुरुस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे. अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नादुरुस्त बसवर तसे शिक्कामोर्तब करणे टाळणे आवश्यक आहे.

सर्वाधिक घटना गंगाखेड आगारातील 
गंगाखेड येथील आगरातील बसच्या बिघाडात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. बसचा पाटा निखळून पडणे, पंक्चर होणे, स्टेअरिंग जाम होणे, स्टेअरिंग तुटणे, ब्रेकफेल होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढल्याने बस प्रवास धोकादायक बनला आहे. यासह अनेक तांत्रिक बिघाड होणे नित्याचेच झाले असल्याची स्थिती आहे. प्रवासात रस्त्यातच बस बंद पडल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

अपघातास कारणीभूत कोण
वाहन चालवताना चालकाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्यूटीवर चढण्यापूर्वी चालक-वाहकाची तपासणी केली जाते. तसेच बस मार्गस्थ करण्यापूर्वी दुरुस्त आहे की, नाही याबाबतही तपासणी केली जाते. मग अपघात झाल्यास यात जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च तरीही...
जिल्ह्यातील चारही आगारांतील बस दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. बसकडे लक्ष दिले जात असल्याचे महामंडळाकडून  सांगण्यात येते. वास्तवात मात्र, बस रस्त्यावर धावताना असे प्रकार घडतात. प्रवाशांची सुरक्षितता महामंडळाकडून नेहमीच लक्षात घेतली जाते. मात्र, अशा घटना होऊ नये याकरिता सर्व आगारांना सूचना दिल्या आहेत. अशा घटना घडल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. 
- प्रवीण शिंदे, उपयंत्र अभियंता

Web Title: Steering wheel for safe travel is blocked; Sometimes the door of the bus and sometimes the wheels come off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.