मानसिक स्थैर्यासाठी पर्यटनाकडे वळली पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:35+5:302021-09-27T04:19:35+5:30
परभणी : मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शारीरिक आरोग्य सांभाळणाऱ्या परभणीकरांनी आता मानसिक स्वास्थ्यासाठी पुन्हा पर्यटनस्थळांची वाट पकडली आहे. ...
परभणी : मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे शारीरिक आरोग्य सांभाळणाऱ्या परभणीकरांनी आता मानसिक स्वास्थ्यासाठी पुन्हा पर्यटनस्थळांची वाट पकडली आहे. कोणी दूर डोंगरपायथ्यांवरील सौंदर्य न्याहाळण्यासाठी तर कोणी जंगलातील वन्यजीवन अनुभवण्याची तयारी करू लागले आहे. एकंदर पर्यटन हा महत्त्वपूर्ण घटक झाला असून, राज्य, आंतरराज्याच्या प्रवासाच्या मर्यादा खुल्या झाल्यानंतर, जवळच्या पर्यटनस्थळांपासून परभणीकरांनी पर्यटनाला सुरुवात केली आहे.
२७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने पर्यटन क्षेत्राच्या सध्याच्या स्थितीचा घेतलेला आढावा. प्रत्येक ठिकाणाला त्याची स्वत:ची ओळख असते. मग ती ऐतिहासिक असेल किंवा भौगोलिक किंवा नैसर्गिक. अशा स्थळांना भेटी देऊन त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवून या स्थळांचा अभ्यास करणे, या स्थळांविषयीचे कुतूहल स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवणे हा मुळातच मानवी गुणधर्म. त्यातूनच मागच्या काही वर्षांपासून पर्यटनाकडे ओढा वाढला आहे. जिल्ह्यातून दरवर्षी हजारो नागरिक देश-विदेशातील पर्यटनस्थळांना भेटी देतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे पर्यटनायन ठप्प झाले होते. आता कोरोनाच्या लसीकरणाला जवळपास सर्वच ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. सर्व व्यवहार पूर्ववत झाले असून, पूर्वीप्रमाणेच जिल्हा-राज्यांच्या सीमा खुल्या झाल्या आहेत. त्यातूनच मागच्या काही दिवसांपासून कळसूबाईचे शिखर, वेरुळ-अजिंठा लेण्या, महाबळेश्वर, वेगवेगळी अभयारण्ये या महाराष्ट्रीयन पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावत आहेत. जमेल त्याप्रमाणे पर्यटकही या स्थळांना भेटी देण्याचे नियोजन करीत असून, राजस्थान, कर्नाटक, जम्मू-काश्मीर या देशांतर्गत पर्यटनासह विदेशी पर्यटनालाही चालना मिळेल, अशी आशा आहे. ही बाब पर्यटनासाठी जेवढी महत्त्वपूर्ण ठरते, तेवढीच जीवनातील मानसिक स्वास्थ्य आणि स्थैर्यासाठीही अनुकूल ठरत आहे.
येत्या सहा महिन्यांत भारतातील पर्यटन जोरात राहील. लसीकरण पूर्ण करून पाच ते सहा दिवसांचे पर्यटन केल्यास कोविडची भीतीही कमी आहे. देशांतर्गत विमानसेवा व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याबरोबरच या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊन रोजगाराचाही प्रश्न मिटू शकतो.
नंदू तापडिया, व्यावसायिक.