रिलायन्स विमा कंपनीविरोधात परभणी जिल्ह्यात १५ ठिकाणी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:35 PM2018-05-16T15:35:42+5:302018-05-16T15:35:42+5:30
पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़
परभणी : पीक विमा नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आज जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला़ या आंदोलनामुळे ठिक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती़
रिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे़ तेव्हा रिलायन्स इन्शुअरन्स कंपनीविरूद्ध सोयाबीन उत्पादकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे नोंदवावेत़ या खरीप हंगामात १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर निश्चित करावी, विमा जोखीम रकमेच्या हेक्टरी ४० हजार रुपये विमा भरपाई द्यावी, दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेले नवीन नियम रद्द करावेत, या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे कॉ़ राजन क्षीरसागर, माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
परभणी शहरातील खानापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला़ गंगाखेड तालुक्यात गंगाखेड, राणीसावरगाव, पालम, दैठणा, परभणी तालुक्यात खानापूर, झिरोफाटा, झरी, पाथरी, सेलू आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ठिक ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ प्रशासनाची धावपळ झाली़
खानापूर फाटा येथे रास्ता रोको
खानापूर फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ पीक विम्याच्या पैशाबरोबरच तुरीचा प्रश्नही या आंदोलनातून मांडण्यात आला़ १५ मे पासून तूर खरेदी बंद पडली आहे़ आॅनलाईन नोंदणी केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक असून, ही तूर खरेदी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, शेख जाफर, दिगंबर पवार, गोपाळ लोंढे, अमोल जवंजाळ, बालाजी मोहिते, दिनकर गरुड, रामकिशन गरुड, गजानन गरुड, शिवाजी आवचार, संतोष थोरात, नागनाथ देशमुख, शिवाजी ढगे, बाळासाहेब ढगे, योगेश दराडे, रमेश दुधाटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़