गोष्ट नाते जोडणा-या प्लंबरच्या प्रयत्नाची !; परभणीत अत्यवस्थ सापडलेल्या युवकाची झाली कुटुंबियांसोबत पुनर्भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:46 PM2017-12-21T16:46:11+5:302017-12-21T17:09:02+5:30
शहरातील एका प्लंबरने दाखविलेल्या सर्तकतेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस स्थितीत उपचार घेत असलेला अनोळखी युवकाला त्याचे कुटुंबिय पुन्हा भेटले आहे.
परभणी : शहरातील एका प्लंबरने दाखविलेल्या सर्तकतेमुळे आणि प्रयत्नांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस स्थितीत उपचार घेत असलेला अनोळखी युवकाला त्याचे कुटुंबिय पुन्हा भेटले आहे. दत्ता विष्णू अंकुशे या मुलाचे नाव असून परभणीतील प्लंबर शेख मोहसीन शेख आयुब यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर पालकांची आणि हरवलेल्या मुलाची भेट झाली आहे.
येथील प्लंबर शेख मोहसीन शेख आयुब हे १३ डिसेंबर रोजी काही कामानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले होते. त्यावेळी रुग्णालयातील एका बेडवर अत्यवस्थ अवस्थेत आणि बेवारस स्थितीत एक युवक पडलेला दिसला. या युवकाची दाढी आणि केस वाढले होते. उत्सुकतेपोटी शेख मोहसीन यांनी येथील डॉक्टरांना या युवकाविषयी विचारपूस केली तेव्हा त्याला रुग्णालयात कोणी दाखल केले आणि हा युवक कोण आहे, याची माहिती उपलब्ध होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे या युवकावर उपचार करतानाही अडचणी निर्माण होत होत्या. मोहसीन यांनी बेवारस अवस्थेतील युवकाला मदत करण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली. डॉक्टरांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर मोहसीन यांनी स्वत: बेवारस अवस्थेतील युवकाची दाढी, कटींगही केली. त्याला स्वच्छ स्नान घातले. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या उपचारानुसार औषधींचा खर्चही केला. हा युवक बरा झाल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉटस्अॅपवर टाकले आणि हे फोटो उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत पोहचल्यानंतर येथील काही जणांनी या युवकांना ओळखले. ही माहिती युवकांच्या कुटुंबियांना देण्यात आली.
२१ डिसेंबर रोजी या युवकाचे कुटुंबीय परभणीत दाखल झाले. त्याचे आई-वडिल आणि मोठी बहीण असे तिघे जण परभणीत पोहचले आणि हरवलेल्या दत्ताची त्यांनी भेट घेतली. हरवलेल्या दत्ताची पुन्हा भेट झाल्याने या कुटुंबियांना गहिवरुन आले. प्लंबर शेख मोहसीन शेख आयुब यांनी केलेल्या प्रयत्नामुळे अत्यवस्थेत हरवलेला मुलाची आणि आई- वडिलांची भेट झाली. यावेळी दत्ता अंकुशे याला निरोप देताना शेख मोहसीन शेख आयुब यांच्यासहयेथील पाणी वीज बचत गटाचे अध्यक्ष रणजीत कारेगावकर, बंडू मगर, विष्णू म्हेत्रे यांची उपस्थिती होती.
फिट्सचा आजार असल्याने हरवला होता दत्ता
परभणी येथे उपचार घेणार्या या मुलाचे नाव दत्ता विष्णू अंकुशे असे असल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांच्या भेटीनंतर सर्वांना समजली. दत्ता हा २२ वर्षांचा युवक असून फिटस् आल्यानंतर तो अचानक गायब होतो. यापूर्वी देखील तो निघून गेला होता. मात्र परभणीत दत्ताला योग्यवेळी उपचार मिळाले आणि त्याच्या आई-वडिलांची भेट झाली.