कानसूर येथून वाहून आलेल्या वाळूने तारुगव्हान ठेक्यावर तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:45 PM2018-05-17T12:45:03+5:302018-05-17T12:45:03+5:30
गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याबाबत आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी ८ दिवसांपासून येथील वाळू ठेका बंद पाडला आहे.
तालुक्यातील तारुगव्हाण येथील नदी पात्रातून ३ हजार ५०० ब्रास वाळू उपसण्यासाठी लिलाव झालेला आहे. यातून मागील महिनाभरातून बेसुमार वाळू उपसा करण्यात आला आहे. यामुळे येथील पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. तर दुसरीकडे बाजूच्या कानसूर पात्रात ग्रामस्थांनी वाळूचा लिलाव करण्यास मज्जाव केला आहे. यामुळे या भागात अद्याप चांगला पाणीसाठा आहे. येथे पाणीटंचाई जाणवत नाही.
मागील आठवड्यात जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे कानसूर पात्रातील वाळू वाहून तारूगव्हाणच्या पात्रात आली. लागलीच येथील ठेकेदाराने याचा उपसा सुरु केला. मात्र, या ठेकेदाराने आधीच वाळूचा अमाप उपसा केला असल्याने कानसूर ग्रामस्थांनी याला विरोध केला. दरम्यान, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि संबंधित ठेकेदार यांनी या ठेक्यावर जाऊन पाहणी.मात्र, कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणचा वाळू उपसा करू दिला जाणार नाही अशी ठोक भूमिका कानसुर ग्रामस्थांनी घेतली आहे. यामुळे मागील आठ दिवसांपासून येथील ठेका बंद आहे. वाळूचा एक कणही पात्रातून उचलू देणार नाहीत या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम असून त्यांची एकजूट आहे.