परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; पाथरी, जिंतूर, सोनपेठात निषेध रॅली

By मारोती जुंबडे | Published: September 2, 2023 07:22 PM2023-09-02T19:22:18+5:302023-09-02T19:22:40+5:30

सकल मराठा समाजाच्या वतीने दिली होती बंदची हाक

Strict lockdown in Parbhani district; Protest rally in Pathri, Jintur, Sonpet | परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; पाथरी, जिंतूर, सोनपेठात निषेध रॅली

परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद; पाथरी, जिंतूर, सोनपेठात निषेध रॅली

googlenewsNext

परभणी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली (सराटी) येथे उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने  २ सप्टेंबर रोजी निषेध नोंदवित परभणी शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी  समाज बांधवांच्या वतीने अंबड तालुक्यातील अंतरवाली (सराटी)  येथे मागील चार दिवसापासून उपोषण सुरू करण्यात आले होते . परंतु शुक्रवारी रात्री या उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. 

तसेच निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यात  त्या घटनेची सखोल चौकशी करून जखमींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निलंबीत करून दोषी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्या करण्यात आल्या. यावेळी समाज बांधव उपस्थित होते. 

पाथरी, जिंतूर, सोनपेठात निषेध रॅली
परभणी शहरासह सकल मराठा समाजाच्या वतीने पाथरी शहरात निषेध रॅली काढून दुपारी ४ वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. त्याच बरोबर मानवत शहरातही व्यापाऱ्यांनी स्फुर्तपणे बंद ठेवला. सेलुत  मराठा समाजाच्या वतीने निषेध रॅली काढून लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. पालम शहरात मराठा समाजाच्या वतीने निषेध रॅली काढून तत्काळ दोषींवर कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. त्याचबरोबर पूर्णा, झरी, जिंतूर, सोनपेठ येथेही अंतरवाली घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात आला. परभणी जिल्ह्यात बंदच्या दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Strict lockdown in Parbhani district; Protest rally in Pathri, Jintur, Sonpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.