सकल मराठा समाजाच्यावतीने परभणीत कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:36 PM2024-02-14T16:36:54+5:302024-02-14T16:37:07+5:30
व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद; अंतरवाली सराटी येथील उपोषणाला दिला पाठिंबा
परभणी: सगेसोयरे या संदर्भात विशेष अधिवेशनात राज्य शासनाने अध्यादेश काढावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी बंदची हाक दिली होती. या हाकेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. बाजारपेठेतील दुकाने कडकडीत बंद होती.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मागील अनेक दिवसापासून आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने सगेसोयरे याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. परंतु, या अधिसूचनेनुसार समाजामध्ये स्पष्टता येत नव्हती. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने विशेष अधिवेशन आयोजित करून सगेसोयऱ्यांबाबत कायदा तयार करावा, या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी बंदची हाक देण्यात आली होती.
या बंद दरम्यान परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांनी रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली. सकल मराठा समाजाच्या वतीने सगेसोयऱ्या संदर्भात अध्यादेश काढण्याची मागणी केली. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठीक ठिकाणी चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या बंदमुळे शहरात दिवसभर शुकशुकाट दिसून आला.