परभणीत शिवजन्मोत्सवाची जिल्हाभरात जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:11 AM2019-02-19T00:11:20+5:302019-02-19T00:11:38+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात साजरी केली जाणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर शहरात ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात साजरी केली जाणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर शहरात ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत़
परभणी शहरात शिवप्रेमींच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे़ यानिमित्त मंगळवारी दुपारी ३ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे़ शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, विसावा कॉर्नरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येईल़ हत्ती, लेझीम पथक, वारकरी, वासुदेव पथक, ढोल, झांज पथक, बँड पथक, गोंधळी पथक, घोडे, उंट, महिला तलवारबाजी व हत्तीवरील अंबारीत छत्रपती शिवरायांची मूर्ती असे या मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे़ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे़ तसेच वारकरी मंडळाच्या वतीने वारकरी दिंडी काढली जाणार आहे़ शहरातील विविध भागांमध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ प्रबोधनात्मक कार्यक्रम, पोवाडे, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, व्याख्यान आदी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे़
दरम्यान, सोमवारीच परभणी शहरात शिवजयंती उत्सवाची तयारी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरासह प्रमुख रस्त्यांवर भगवे ध्वज, पताका लावण्यात आल्या आहेत़ जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा, मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत़ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात भव्य अशा एलईडी दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़