१५ गावांतील विद्यार्थिनींची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:47+5:302020-12-15T04:33:47+5:30
बोरी : राज्य शासनाच्या वतीने अनलॉकमध्ये दहावी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद ...
बोरी : राज्य शासनाच्या वतीने अनलॉकमध्ये दहावी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली मानव विकास बसची सेवा अद्यापही एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरातील १५ गावांतील विद्यार्थिनींना गैरसोयींचा सामना करत शाळा गाठावी लागत आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय, साईकृपा विद्यायल, ज्ञानोपासक महाविद्यायल, जि.प. शाळा, बसवेश्वर महाविद्यालय या ठिकाणी कौसडी, कान्हड, पिंपळगाव, मारवाडी, कोक, माक, जवळा, वाघी, मालेगाव, नांदगाव, बोर्डी, डोहरा, रोहिला पिंप्री, वरणा व निवळी आदी १५ गावांतील विद्यार्थिनी शिक्षण घेतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर एसटी महामंडळानेही आपली सेवा बंद केली होती. मात्र आता अनलॉकमध्ये एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्याचबरोबर आता आठ दिवसांपासून राज्य शासनाच्या वतीने दहावी, बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या वतीने जिंतूर आगारातून अद्यापही मानव विकासची बससेवा अद्याापही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे १५ गावांतील विद्यार्थिनींना शाळा, महाविद्यालये गाठण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.