वैद्यकीय प्रवेशाच्या ७०/३० च्या फॉर्म्यूल्याविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:38 PM2019-07-02T16:38:33+5:302019-07-02T16:40:32+5:30
वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेला ७०/३० चा फॉर्म्यूला रद्द करावा
परभणी- वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेला ७०/३० चा फॉर्म्यूला रद्द करावा, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या नेतृत्वाखाली परभणीतील विद्यार्थ्यांनी २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला.
वैद्यकीय प्रवेशासाठी ७०/३० हा फॉर्म्यूला मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्यायकरणारा आहे. या आरक्षणामुळे हजारो गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत. मराठवाड्यात केवळ ६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी केवळ ६५० जागा असून विदर्भात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १४५० जागा आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याने या फॉर्म्यूल्याच्या विरोधात मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला.
येथील वसमतरोडवरील शिवाजी महाविद्यालयासमोरुन या मोर्चाला सुरुवात झाली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा, ७०/३० चा फॉर्म्यूला रद्द करा, असे फलक घेऊन विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. वसमतरोडमार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.