महाविद्यालयाने विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:33 PM2017-10-06T18:33:56+5:302017-10-06T18:35:19+5:30
सोनपेठ येथील राजीव गांधी संगणक शास्ञ महाविद्यालयाने पदवी प्ररीक्षेचे शुल्क विद्यापीठाकडे न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. या विरोधात या विद्यार्थ्यांनी आज तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदारांना महाविद्यालयावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन दिले आहे.
परभणी, दि. ६ : सोनपेठ येथील राजीव गांधी संगणक शास्ञ महाविद्यालयाने पदवी प्ररीक्षेचे शुल्क विद्यापीठाकडे न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. या विरोधात या विद्यार्थ्यांनी आज तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदारांना महाविद्यालयावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन दिले आहे.
नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सोनपेठ येथील राजीव गांधी संगणक शास्त्र महाविद्यालय येते. विद्यापीठाच्या पदवी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, गांधी महाविद्यालयाच्या ढिसाळ कारभाराने येथील पदवीची विद्यार्थी या सत्र परीक्षेला मुकले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे परीक्षा शुल्क जमा केले होते परंतु, महाविद्यालयाने ते शुल्क विद्यापीठाकडे पाठवलेच नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे .
यासोबतच त्यांना व त्यांच्या पालकांना आर्थिक व मानसिक तरसा होणार तो वेगळाच. यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयावर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन सोनपेठ तहसिलदारांना दिले आहे. तहसिलदारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत याबाबत जिल्हाधिका-यांना महाविद्यालयावर कडक कारवाई करावी असा अहवाल पाठवला आहे. तसेच पोलिसात देखील यासंबंधी गुन्हा नोंदवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.