शाळा-महाविद्यालयातील क्षमतेपेक्षा अधिकचे विद्यार्थी प्रवेश होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 07:07 PM2018-08-14T19:07:04+5:302018-08-14T19:07:43+5:30
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत
परभणी : शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक देण्यात आलेले प्रवेश रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असून या संदर्भातील बाबींची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भरारी पथक स्थापन करण्याचेही ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश होत असल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्या स्वाक्षरीने ९ आॅगस्ट रोजी काढण्यात आले आहेत.
त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील जवळच्या ग्रामीण भागातील परिसरांमध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत किंवा नाही, हे तपासण्यासाठी सर्व शैक्षणिक विभागांमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किमान ४ भरारी पथकांची स्थापना करण्यात यावी, या भरारी पथकांमध्ये मान्यताप्राप्त व प्रतिष्ठित उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील निवडक ३ प्राचार्यांचा समावेश करावा. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकांनी संबंधित शाळांना भेटी देऊन क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी शिक्षण उपसंचालकांना सादर करावी व उपसंचालकांनी ती तातडीने शिक्षण संचालकांना सादर करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्यास्तरावरुन अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत, एखाद्या उच्च माध्यमिक विद्यालयाने क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्यास संबंधित विद्यालयातील जादा विद्यार्थ्यांना १२ वीच्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे क्लास/ संस्थाचालकांच्या सांगण्यावरुन ज्या विद्यार्थ्यांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, त्या विद्यालयांमधील प्रवेश रद्द करुन मंजूर प्रवेशित क्षमतेच्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावेत, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत.
सर्व माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची ‘सरल’मधील माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांची मंजूर क्षमता, प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आणि ‘सरल’मधील विद्यार्थ्यांची संख्या या सर्व बाबी लक्षात घेऊनच राज्य मंडळाने १२ वीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारावेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाच्या या आदेशानुसार लवकरच जिल्ह्यात कारवाई होणार आहे. त्यामुळे खाजगी शिक्षण संस्था चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बायोमेट्रिक उपस्थितीमुळेच घेतला निर्णय
राज्याच्या शिक्षण विभागाने ११ वीच्या विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय २५ जून रोजी घेतला होता. खाजगी कोचिंग क्लासेसचे पेव वाढल्याने शहरालगतच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची औपचारिकता पूर्ण करुन अनेक विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थितीच राहत नाहीत व ते थेट खाजगी शिकवण्यांमध्येच गुंतून राहतात. त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसला आळा बसावा, या उद्देशाने राज्य शासनाने बायोमॅट्रिकचा निर्णय घेतला. आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शहरांलगतच्या कनिष्ठ विद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक दिलेले प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाने खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना एक प्रकारे इशाराच दिला असल्याचे मानले जात आहे.