ग्रामपंचायतींनो अभ्यास करा, गुण कमवा आणि निधी मिळवा; अनुदानासाठी नवे निकष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 10:44 AM2017-11-16T10:44:39+5:302017-11-16T10:48:01+5:30
गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार
मानवत ( परभणी ) : गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणा-या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सादर प्रस्तावात हे निकष घोषित केले आहेत.
ग्रामपंचायतींना गाव पातळीवर लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाकडून गाव विकासासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची तरतूद आहे. या निधीतून गावात विकासकामे करण्यात येतात. ग्रामविकास विभागाने आगामी तीन वर्षासाठी वार्षिक प्रस्ताव सादर केला आहेत. त्यानुसार चार मुद्यांच्या आधारे ग्रामपंचायतींना १०० पैकी गुण दिले जाणार आहेत. याच गुणांच्या आधारे मंजूर निधी लोकसंख्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात किमान ५० ते १०० टक्के वितरित केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित सादरीकरणानुसार निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी त्यांच्या लेखी नोंदी ठेऊन त्यांचे आॅडीट करणे देखील आवश्यक आहे. लेखा परीक्षणातील नोंदीवरून ग्रामपंचायतीच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा वाढ अपेक्षित आहे. ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा पूर्ण करून तो योजनेच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.
वित्त आयोगांतर्गत अगोदरच्या वर्षी सादर प्रस्तावात केलेल्या खर्चाचा तपशीलही क्षेत्र निहाय केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या संकेतस्तळावर दाखवावा लागणार आहे. त्यावरून गुण दिले जाणार आहेत. ग्रामपंचायतींनी आपल्या उत्पादनात वाढ केल्यास १० गुण, २५ ते ५० टक्के वाढ केल्यास १५ गुण, ५० टक्केपेक्षा जास्त वाढ केल्यास २० गुण दिले जाणार आहेत. प्रमाणित लेख्यावरून मागील वर्षाच्या १४ व्या वित्त आयोगांतर्गत पात्र बेसिक निधीच्या प्रमाणात उत्पादनाची टक्केवारी १० टक्केपर्यंत असल्यास २० गुण, १० ते २० टक्के असल्यास २० गुण, २० ते ३० टक्के असल्यास ३० गुण व ३० टक्के पेक्षा जास्त असल्यास ४० गुण देण्यात येणार आहेत.
मागील वर्षा ग्रामपंचायत पांदणमुक्त असेल तर ३० गुण, लसीकरण झाल्यास १० गुण या चार मुद्यांच्या आधारे त्या-त्या ग्रामपंचायतींना गुण दिले जाणार आहेत. १०० पैकी ४९ टक्केपर्यंत गुण प्राप्त झाल्यास लोकसंख्या व क्षेफळाच्या आधारे मंजूर निधीच्या ५० टक्के निधी, ५० ते ६० टक्के गुण मिळाल्यास ७० टक्के निधी, ६१ ते ७० गुण मिळाल्यास ८० टक्के निधी तर ७१ पेक्षा जास्त गुण मिळाल्यास १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्यामुळे आता गाव करभाºयाला ग्रामपंचायतींच्या कामामध्ये सुधारणा करणे आवश्यक होणार आहे.
गाव पुढा-यांची वाढणार डोकेदुखी
ग्रामविकास विभागाचे उपसचिव एन.बी. रिंगणे यांनी ३ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१७ ते २०२० या आर्थिक वर्षातील निधीच्या वितरणाबाबतच्या निकषातील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनेच्या अधीन राहून ग्रामपंचायतींना परफॉरमन्स निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना या अगोदर मोठ्या प्रमाणात १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट मिळत असल्याने ग्रा.पं. स्तरावरील राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. मात्र आता हा निधी मिळविण्यासाठी निकषाची अट घातल्याने गाव पुढा-यांची डोकेदुखी वाढली आहे. पुन्हा बघू असे रेटून बोलणाºया सरपंचांना ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासह काम दाखवावे लागणार आहे.
सुधारणा करण्यास मदत
ग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने गुणाचे निकष लावून दिले आहेत. निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायती धडपड करतात. परिणामी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यास व सुधारणा करण्यास मदत होणार आहे.
- शैलेंद्र पानपाटील, विस्तार अधिकारी पं.स., मानवत