संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच परभणीत सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:22 AM2021-08-20T04:22:53+5:302021-08-20T04:22:53+5:30
परभणी : कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरचे उपकेंद्र परभणी येथे लवकरच सुरू करण्यात येणार असून, याबाबत मुख्यमंत्री ...
परभणी : कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरचे उपकेंद्र परभणी येथे लवकरच सुरू करण्यात येणार असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सदर प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, मराठवाड्यात सद्य:स्थितीत संस्कृत विषयाच्या अभ्यासासाठी कोणतेही विद्यापीठ नाही. याबाबत मराठवाड्यातील अनेक संस्कृत पंडितांनी आणि त्यांच्याकडे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाचे अध्यासन केंद्र परभणी येथे स्थापन करण्यासंदर्भात आपल्याकडे मागणी केली होती. जागतिक पातळीवर संस्कृत भाषेच्या वाढत्या महत्त्वामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा संस्कृत विषयाकडे कल वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांना नागपूर येथे असलेल्या विद्यापीठात राहून शिक्षण घेणे खर्चिक आणि अडचणीचे ठरू लागल्याने या विद्यापीठाचे उपकेंद्र परभणी येथे सुरू करण्याविषयीच्या मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने करीत आहे. १७ ऑगस्ट रोजी याबाबत मुंबईत उभयतांशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली असून, येत्या दोन आठवड्यात परभणी येथे उपकेंद्र स्थापन करण्याबाबत अधिसूचना काढण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले असल्याचे आ. डॉ. पाटील म्हणाले.