सोनपेठच्या क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लावणार-वरपुडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:25+5:302021-03-04T04:30:25+5:30
सोनपेठ तालुक्यातील खेळाडूंसाठी सोनपेठ हे तालुक्याचे ठिकाण असूनही तालुका क्रीडा संकुल नाही. त्यामुळे तालुक्यातील खेळाडूंची अनेक वर्षांपासून गैरसोय सुरू ...
सोनपेठ तालुक्यातील खेळाडूंसाठी सोनपेठ हे तालुक्याचे ठिकाण असूनही तालुका क्रीडा संकुल नाही. त्यामुळे तालुक्यातील खेळाडूंची अनेक वर्षांपासून गैरसोय सुरू आहे. राज्य शासनाने प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल मंजूर करण्याचे धोरण आखले, तरीही सोनपेठ येथे अद्याप तालुका क्रीडा संकुल झालेले नाही. जागा व निधीची अडचण असल्याने हे तालुका क्रीडा संकुल उभारणीस मुहूर्त मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर पाथरीचे आ. सुरेश वरपुडकर यांनी सोनपेठच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने त्यांनी मंगळवारी मुंबईत क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर सोनपेठ येथील क्रीडा संकुलाच्या जागेचा व निधीचा प्रश्न मांडला. यावेळी केदार यांनी राज्य शासन प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल उभारण्यास कटिबद्ध आहे. सोनपेठच्या क्रीडा संकुलासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले, असे आ. सुरेश वरपुडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोनपेठच्या क्रीडा संकुलाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे ते म्हणाले.