मनुष्यबळासाठी प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:16 AM2021-01-21T04:16:41+5:302021-01-21T04:16:41+5:30
परभणी : नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचाविण्यासाठी अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीबाबत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ...
परभणी : नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचाविण्यासाठी अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीबाबत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या आहेत.
‘परभणी जिल्ह्यातील २० लाख नागरिकांची सुरक्षा ९ कर्मचाऱ्यांवर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १९ जानेवारी रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तात अन्न व औषध प्रशासनातील कमी मनुष्यबळाचा प्रश्न मांडला होता. त्याचप्रमाणे, राज्यातील एकूण लोकसंख्या आणि अन्न व्यावसायिकांची संख्या यांच्या प्रमाणात अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याबाबत महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेने अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या वृत्ताची दखल घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या संदर्भात बैठक पार पडली. त्यात अन्न विभागातील आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि पदोन्नतीबाबत त्वरित प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विभागाला दिले.