जिवंत शेतकऱ्यास मृत दाखवून बंद केले अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:23 AM2021-08-18T04:23:30+5:302021-08-18T04:23:30+5:30
परभणी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या एका शेतकऱ्यास अचानक मृत दाखवून त्याच्या अनुदानाचा लाभ बंद करण्याचा प्रकार ...
परभणी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या एका शेतकऱ्यास अचानक मृत दाखवून त्याच्या अनुदानाचा लाभ बंद करण्याचा प्रकार जिल्ह्यात घडला असून, प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे हा शेतकरी शासनाच्या लाभापासून वंचित राहिला आहे. आता या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक साह्य व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत चार महिन्यांनी एक वेळा २ हजार रुपये असे वर्षातून तीन वेळा ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. तालुक्यातील काष्टगाव येथील सीताराम ज्ञानोबा सुरवसे हे या योजनेसाठी पात्र होते. त्यांना आतापर्यंत ९ हप्त्यांचे अनुदानही मिळाले. मात्र, अचानक त्यांचे अनुदान बंद करण्यात आले. अनुदान का बंद झाले, याची चौकशी केली असता, शेतकरी मृत झाल्याने त्यांचे अनुदान बंद केल्याचे सांगण्यात आले, प्रत्यक्षात प्रशासनाकडे कोणताही पुरावा नसताना परस्परच जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान बंद करण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, योजनेचे अनुदान मिळत नसताना, प्रत्यक्ष शेतकरी तहसील कार्यालयात खेटा मारत असताना, कोणतीही शहानिशा न करता, त्यालाच मृत दाखवून त्याला योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. दुसरीकडे अनेक अपात्र लाभार्थ्यांच्या नावे अनुदान दिले जात आहे, त्याची मात्र चौकशी होत नाही.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर सीताराम ज्ञानोबा सुरवसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच काष्टगाव येथील शेतकऱ्यांप्रमाणेच इतर किती शेतकऱ्यांना अपात्र ठरविले आहे, याचीही चौकशी करावी, काष्टगाव येथील सीताराम सुरवसे यांचे अनुदान परत सुरू करावे, अशी मागणी केली आहे.