अशीही युती! ताडकळस बाजार समितीत भाजपचा सभापती, तर राष्ट्रवादीचा उपसभापती
By मारोती जुंबडे | Published: May 25, 2023 06:52 PM2023-05-25T18:52:25+5:302023-05-25T18:52:43+5:30
ताडकळस बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे ९, काँग्रेसचे ६, तर राष्ट्रवादीचे ३ संचालक निवडून आले होते.
ताडकळस : बहुचर्चित बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी गुरुवारी (दि. २५) सभागृहात आयोजित विशेष बैठकीत भाजपचे बालाजी रुद्रवार सभापतिपदी, तर राष्ट्रवादीचे अंकुश शिंदे यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली. त्यामुळे ताडकळस बाजार समितीत राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याचे पहावयास मिळाले.
ताडकळस बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे ९, काँग्रेसचे ६, तर राष्ट्रवादीचे ३ संचालक निवडून आले होते. या ठिकाणी एकाही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. २५ मे रोजी बाजार समितीच्या सभागृहात सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडप्रक्रियेसाठी सभापतिपदासाठी भाजपकडून बालाजी रुद्रवार, तर काँग्रेसकडून अजित वरपूडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, तर उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून अंकुश शिंदे, भाजपकडून सुरेश गिरी, तर काँग्रेसकडून रामेश्वर शिंदे यांचा अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर भाजपचे सुरेश गिरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
यामध्ये सभापतिपदासाठी १२ विरुद्ध ६ तर उपसभापतिपदासाठी १२ विरुद्ध ६ अशी लढत होऊन सभापतिपदी भाजपचे बालाजी रुद्रवार, तर राष्ट्रवादीचे अंकुश शिंदे यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया अधिकारी म्हणून नायब तहसीलदार विजयकुमार बेलोलू यांनी काम पाहिले. यावेळी सचिव शंकर देशमुख, नामदेव कळसाईतकर यांनी या ठिकाणी साहाय्य केले. निवडीनंतर ताडकळस येथील प्रमुख मार्गावरून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, गणेशराव रोकडे, विजय वरपूडकर, आबासाहेब पवार आदींची या ठिकाणी उपस्थिती होती. याप्रसंगी ठाणेदार कपिल शेळके, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर तरडे, हनुमान मरगळ, रामकिशन काळे, किशोर भेंडे, माणिक डुकरे या पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.