अचानक वीज खंडित केल्याने एकाच दिवसात २०० विद्युत मोटारी जळाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:15 PM2017-11-06T12:15:23+5:302017-11-06T12:17:30+5:30
कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़
जिंतूर (परभणी) : महावितरणच्या वतीने जिंतूर तालुक्यात वीज वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़
महावितरणच्या वतीने शेतक-यांकडून वीज बिल थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ येलदरी ३३ केव्ही अंतर्गत २२ गावे येतात़ आठ दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे़ ज्या शेतक-यांनी वीज बिल भरले नाही, अशा शेतक-यांची वीज जोडणी तोडली जात आहे़ येलदरी, सावळी, केहाळ, घडोळी, चिंचखेडा, आमदरी, खोलगाडगा, मुरूमखेडा, हिवरखेडा, गणेशनगर, साईनगर तांडा, इटोली, ब्रह्मवाडी, तांदूळवाडी, लिंबाळा येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ वीजपुरवठा खंडित करताना शेतक-यांना कोणतीही सूचना दिली जात नाही़ शेतक-यांचे विद्युतपंप आॅटोमॅटिक आहेत़ त्यामुळे वीज बिल भरणा केल्यानंतर विद्युत जोडणी करताना दोन फेज टाकले जात आहेत़ त्यामुळे आॅटोमॅटिक विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यात आतापर्यंत जवळपास २०० विद्युत मोटारी जळाल्या आहेत. विद्युत मोटार दुरुस्तीसाठी एका शेतक-याला ४ ते ५ हजार रुपयांचा खर्च येत आहे़ यामुळे शेतक-यांचे आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़
१ कोटी ७० लाखांची थकबाकी
येलदरी ३३ केव्ही केंद्राअंतर्गत केवळ १३१ कृषी पंपधारक असल्याची नोंद महावितरणकडे आहे़ प्रत्यक्षात हा आकाडा हजारांच्या घरात आहे़ ३३ केव्ही केंद्राअंतर्गत किती विद्युत रोहित्र आहेत? याची माहिती महावितरणकडे नाही़ शेतक-यांकडे १ कोटी ७० लाखांची थकबाकी दाखविली आहे़ परंतु, या केंद्रामध्ये दोन वर्षांपासून केवळ एकच आॅपरेटर आहे. त्यामुळे दुरुस्ती देखभालीचे काम करण्यासाठी कर्मचा-यांची कमतरता आहे़ विजेचा दाब नेहमी कमी जास्त होत असल्याने त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे़
रबी हंगामाची चिंता
सध्या रबी हंगामासाठी शेतकरी मशागत करीत आहेत़ काही प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, महावितरणच्या कारवाईमुळे रबी हंगामाला मुकावे लागते की काय? याची चिंता शेतक-यांना लागली आहे. येलदरी येथील ३३ केव्ही केंद्राअंतर्गत कृषीपंप जळाल्याबाबत आपण चौकशी करून कार्यवाही करू.
- डब्ल्यू़ यू़ नगराळे, कार्यकारी अभियंता, विभाग-२
नुकसान भरपाई द्यावी़
महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे़ कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याने शेतक-यांचे कृषीपंप जळाले आहेत़ या सर्व प्रकाराला महावितरण जबाबदार आहे. योग्य ती कारवाई करून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी़
- सुंदरराव चव्हाण, माजी सभापती
कारवाई करावी.
महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे २०० ते ३०० मोटारी जळाल्या आहेत़ याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
- भगवानराव म्हाळणकर, शेतकरी हिवरखेडा