प्रजासत्ताकदिनी परभणीच्या कुटुंबांचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 03:03 AM2018-01-27T03:03:35+5:302018-01-27T03:03:54+5:30
पोलीस कोठडीत पतीचा मृत्यू झाला. दोषी पोलिसांवर कारवाई केली. मात्र कुटुंबाच्या आर्थिक मदतीच्या मागणीकडे प्रशासन तसेच मुख्यमंत्र्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे तीन मुलांसह पत्नी आणि भावाने प्रजासत्ताकदिनी आत्महत्या करण्याचे ठरविले होते
मुंबई : पोलीस कोठडीत पतीचा मृत्यू झाला. दोषी पोलिसांवर कारवाई केली. मात्र कुटुंबाच्या आर्थिक मदतीच्या मागणीकडे प्रशासन तसेच मुख्यमंत्र्यांनीही दुर्लक्ष केल्यामुळे तीन मुलांसह पत्नी आणि भावाने प्रजासत्ताकदिनी आत्महत्या करण्याचे ठरविले होते. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून ही बाब उघड झाली. परभणी नानलपेठ पोलीस ठाण्यात २५ डिसेंबर २०१६ मध्ये ३८ वर्षीय समशेर खान याला चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत तीन पोलिसांना अटक करण्यात आली होती. मात्र घरचा कर्ता पुरुष गेल्याने खान कुटुंबीय रस्त्यावर आले.
आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली होती. अखेर सर्वांकड़ून मदतीचे दार बंद झाल्याने खान कुटुंबीयांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. दादर शिवाजी पार्क परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडत असलेल्या संचलनादरम्यान त्यांनी स्वत:ला संपविण्याचे ठरविले होते. रॉकेलची बॉटल व एक छोटा चाकू घेऊन ते तेथे दाखल झाले.
तिघेही आत्महत्येचा प्रयत्न करणार त्यापूर्वीच शिवाजी पार्क पोलिसांनी खान याची पत्नी अखिलाबेगम समशेर खान,३५ वर्षे, तिचा मुलगा मन्सूरखान समशेर खान,१५ तसेच तिचा दीर यासिन खान शामिर खान,३० यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत वरील बाब उघडकीस आली आहे. महिलेकडील एक रॉकेलची बॉटल व एक छोटा चाकू हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांनी दिली.