डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने शुगरबेल्ट धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:12 AM2021-02-22T04:12:07+5:302021-02-22T04:12:07+5:30
पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. ...
पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळीत घट झाली आहे. पाणी सोडल्याने गोदाकाठचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे. २५ गावांतील शेतीवर याचा परिणाम पुढील काळात जाणवणार अशी चिन्ह दिसत आहेत.
गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधाऱ्यात या वर्षी ४७ दलघमी पाण्याचा साठा उपलब्ध होता. त्यामुळे मागील ८ महिन्यांपासून गोदावरीचे पात्र तुडुंब भरले होते. हा पाणीसाठा पाहून गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या दोन्ही बाजूंच्या २५ गावांच्या शिवारात या वर्षी नगदी पीक म्हणून ओळखले जात असलेल्या उसाचे १० हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने, उसाची शेती करणाऱ्यांची संख्या या वर्षी वाढलेली पाहावयास मिळत आहे. अजूनही काही गावांत ऊस लावला जात आहे. उसाचे क्षेत्र वाढत असल्याने, गोदाकाठ परिसर शुगरबेल्ट म्हणून उदयास येत आहे. आजूबाजूला ५ साखर कारखाने सुरू असल्याने उसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऊस वेळेवर कारखान्याला नेला जातो. मात्र, मागील ८ दिवसांपूर्वी डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठा नांदेडला सोडून देण्यात आले आहे. २७ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जेमतेम २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यातही गोदावरी नदीच्या पात्रात जास्त गाळ शिल्लक राहतो. त्यामुळे पुढील महिनाभरातच गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हजारो रुपये खर्च करून लागवड केलेले उसाचे पीक पाण्याअभावी वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरचा शुगरबेल्ट धोक्यात आला आहे.