ऊस उत्पादकांचा तीन तास रास्ता रोको; दराचा निर्णय झाला अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलाल
By मारोती जुंबडे | Published: January 17, 2024 07:20 PM2024-01-17T19:20:31+5:302024-01-17T19:20:57+5:30
राजू शेट्टी यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व; कारखानदारांकडून २७०० रुपये भाव देण्याचे आश्वासन
परभणी: ऊसाला सरसकट प्रतिटन २७०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. २ तास चाललेल्या या आंदोलनानंतर जिल्ह्यातील सात साखर कारखानदारांनी हा भाव देण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा रास्ता रोको ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आला.
जिल्ह्यातील ऊसाला २७०० रुपये प्रति टन भाव देण्यात यावा, या मागणीसाठी मागील दोन महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा धसका घेऊन जिल्ह्यातील सात पैकी पाच कारखान्यांनी हा भाव देऊ असे जाहीर केले. परंतु, जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे प्रशासन हे भाव देण्यास तयार नव्हते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेले हे रास्ता रास्ता रोको आंदोलन दोन तास चालले. या आंदोलनादरम्यान त्या दोन साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी शेट्टी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर बराच वेळ चाललेल्या चर्चा दरम्यान ऊसाला प्रतिटन २७०० रुपये भाव देण्याचे हमी यावेळी देण्यात आली. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आदोंलनात किशोर ढगे, दिपक लिपणे, रामप्रसाद गमे,गजानन तुरे, रामराजे महाडीक, प्रसाद गरुड, मुंजा लोडे, पंडित भोसले, तानाजी भोसले, रुपेश शिंदे, शेख चाँद, विकास भोपळे, गजानन दुगाने, माऊली शिंदे, मयुर वाघमारे, नागेश दुधाटे, सचिन शिंदे आदींसह कार्यकर्ते व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन् शेतकऱ्यांनी उधळला गुलाल
जिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन २७०० भाव देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन तास चाललेल्या आंदोलनाला यश आले. त्यानंतर उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनस्थळी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
वाढीव ६४ कोटी रुपये मिळणार
जिल्ह्यातील ऊसाला सात पैकी दोन कारखानदारांकडून २४०० ते २५०० प्रतिटन भाव देण्यात येत होता. त्यामुळे सातही कारखान्यांनी उसाला २७०० रुपये प्रति टनचा भाव द्यावा, यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आल्यानंतर जिल्ह्यात यावर्षी जवळपास ३२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. या पोटी सुधारित भावाने जवळपास ६४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.