उसाला क्विंटलमागे फक्त १० रुपये वाढ; केंद्र सरकारच्या निर्णयाची 'स्वाभिमानी'कडून होळी
By ज्ञानेश्वर भाले | Published: June 29, 2023 04:05 PM2023-06-29T16:05:16+5:302023-06-29T16:06:11+5:30
उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला फक्त दहा रुपये वाढ
परभणी : ऊस एफआरपी रक्कमेत केवळ १० रूपये प्रति क्विंटल वाढ देणाऱ्या केंद्र सरकारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गुरुवारी सरकारच्या या निर्णयाची होळी करण्यात आली.
उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रति टनास शंभर रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचा डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये वर्षभरात जवळपास ३३ टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये रासायनिक खतांची वाढ २२ टक्क्याहून होऊन वाढली आहे. यामुळे आज झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के असल्याने यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईमुळे व उत्पादन खर्चामध्ये जवळपास ५२ टक्केची वाढ झाली आहे.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास पाच वर्षात फक्त शेतकऱ्यांना टनाला ३५० रुपयाची वाढ मिळाली आहे. या सर्व पार्श्भूमीवर केंद्र सरकारच्या निर्णयाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला. या वेळी किशोर ढगे, भास्कर खाटिंग, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, माऊली लोडे, अंकुश शिंदे, संजय शिंदे, रामेश्वर आवरगंड, शंकर भागवत, ज्ञानराज चव्हाण, उध्दव जवंजाळ, शंकर भागवत, माऊली शिंदे कार्यकर्ते हजर होते.