एसडीपीओंचे गणरही अधीक्षकांनी परत बोलाविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:18 AM2021-07-31T04:18:51+5:302021-07-31T04:18:51+5:30
जिल्हा पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना परस्पर प्रतिनियुक्तीवर ठेवल्याची बाब काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर यासंदर्भात पोलीस अधीक्षक ...
जिल्हा पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना परस्पर प्रतिनियुक्तीवर ठेवल्याची बाब काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर यासंदर्भात पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी कडक भूमिका घेत परस्पर प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मूळ ठिकाणावर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पुरविण्यात आलेले गणर विविध पोलीस ठाण्यांतून देण्यात आले आहेत. या गणर कर्मचाऱ्यांनाही आता परत पोलीस मुख्यालयात पाठविण्याचे आदेश अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांना आता पोलीस मुख्यालयातून गणर पुरविले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हे गणर देताना ते २०१६-१७ या बॅचचे असावेत, अशी अटही अधीक्षकांनी घातली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या चालक पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील मोटार वाहन विभागात परत पाठविण्याचे आदेश दिले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांसाठी मोटार परिवहन विभागातून तात्पुरत्या स्वरूपात चालक पुरविले जातील, असे निर्देश अधीक्षकांनी दिले आहेत.
मागील दोन दिवसांपासून जिल्हा पोलीस दलात अनेक फेरबदल होत आहेत. त्यामुळे पोलीस दलात सध्या खळबळ उडालेली आहे.