परस्पर प्रतिनियुक्तीला पोलीस अधीक्षकांचा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:01+5:302021-07-29T04:19:01+5:30
परभणी : जिल्ह्यात पोलीस दलातील अंमलदारांना परस्पर इतरत्र संलग्न करण्याचे प्रकार वाढले असून, अशा परस्पर संलग्नतेच्या आदेशाला पोलीस ...
परभणी : जिल्ह्यात पोलीस दलातील अंमलदारांना परस्पर इतरत्र संलग्न करण्याचे प्रकार वाढले असून, अशा परस्पर संलग्नतेच्या आदेशाला पोलीस अधीक्षकांनी ब्रेक दिला आहे.
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयात सेवा दिली असताना पोलीस अधीक्षकांच्या परस्पर काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतर पोलीस ठाण्यांमध्ये संलग्न करून घेण्याचे प्रकार प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांकडून झाले आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी २६ जुलैला परस्पर संलग्न केलेल्या या आदेशांना रद्द करीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मूळ नेमणुकीच्या ठिकाणी पाठविण्याचे आदेश काढले आहेत. यापुढे जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील कोणतेही पोलीस अंमलदार हे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाशिवाय मूळ नेमणुकीच्या व्यतिरिक्त इतरत्र संलग्न होणार नाहीत, अन्यथा संलग्नतेचे आदेश काढणारे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी यांच्यासह संबंधित पोलीस अंमलदार हे विभागीय चौकशीस पात्र राहतील, असे या पत्रकात पोलीस अधीक्षकांनी नमूद केले आहे.
मूळ नेमणुकीच्या ठिकाणी पाठवा
आतापर्यंत इतरत्र संलग्न केल्याचे परस्पर आदेश काढलेल्या पोलीस अंमलदारांची यादी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षास सादर करावी. तसेच इतरत्र संलग्न केलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना त्यांचे मूळ नेमणुकीचे आदेश व संलग्नतेचे आदेश सोबत घेऊन पोलीस अधीक्षक यांच्या कक्षात पाठविण्याच्या सूचनाही या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
दत्त यांच्याकडे सेलू उपविभागाचा पदभार
सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर सेलू येथील सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे परभणी येथील सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांच्याकडे सध्या शहर विभागाचा पदभार असून, त्यांना परभणी ग्रामीण, पूर्णा आणि गंगाखेड या उपविभागांचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
तसेच पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्याकडे परभणी ग्रामीण उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार दिला होता. या पदभारातून काकडे यांची मुक्तता करण्यात आली असून, त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी म्हणजे पोलीस नियंत्रण कक्षात परत करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढले आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस दलात अनेक फेरबदल होत असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू केले जात आहे.