सखी वन स्टॉप सेंटरचा महिलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:43+5:302021-01-17T04:15:43+5:30

परभणी: शारीरिक, मानसिक, लैंगिक व कौटुंबिक छळाने त्रस्त झालेल्या महिलांसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ...

Support of women of Sakhi One Stop Center | सखी वन स्टॉप सेंटरचा महिलांना आधार

सखी वन स्टॉप सेंटरचा महिलांना आधार

googlenewsNext

परभणी: शारीरिक, मानसिक, लैंगिक व कौटुंबिक छळाने त्रस्त झालेल्या महिलांसाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेले सखी वन स्टॉप सेंटर आधार ठरले असून गेल्या वर्षभरात १२५ महिलांनी या केंद्राकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.

शारीरिक, मानसिक, लैंगिक, कौटुंबिक छळ, ॲसिड हल्ला किंवा सायबर क्राईम आदी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, वैद्यकीय सल्ला व समुपदेशन या उद्देशाने मदत करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २०१९ मध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले होते. परभणी येथेही महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने केरवाडी येथील सामाजिक व आर्थिक विकास संस्थेच्या माध्यमातून २५ डिसेंबर २०१९ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात हे केंद्र स्थापन केले आहे. या संस्थेचे कर्मचारी येथे तक्रार घेऊन आलेल्या महिलांचे समुपदेशन करतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. या केंद्राचे येथील कार्य उत्कृष्टरित्या चालू असून त्याचा अनेक पीडित महिलांना लाभ झाल्याची माहिती संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

गरजेनुसार निवाऱ्याचीही केली जातेय व्यवस्था

कौटुंबिक छळाच्या माध्यमातून अनेकवेळा महिलांना घराबाहेर काढले जाते. अशा महिला तक्रार करण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये येतात. पीडित महिलांच्या गरजेनुसार या सेंटरच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१५ मध्ये देशभरात लागू करण्यात आलेली ही योजना परभणी जिल्ह्यात डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झाली. उशिराने योजना सुरू झाली असली तरी त्याचा फायदा अनेक पीडित महिलांना मिळत आहे.

या केंद्रातून काय काम केले जाते ?

अत्याचारास सामोरे जावे लागणाऱ्या महिलेला विविध बाबींवर मदतीची आवश्यकता असते. मानसिकरित्या खच्चीकरण झालेल्या या महिलांना एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सेवा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत आदी प्रकारच्या सुविधा या सखी वन स्टॉप सेंटरमधून देण्यात येत आहेत.

गेल्या वर्षभरात परभणी येथील केंद्रात १२५ महिलांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या तक्रारींचे निरसन या केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. काही तक्रारी बाललैंगिक स्वरूपाच्याही होत्या. त्यासंदर्भातही या तक्रारींची सोडवणूक करून संबंधितांना मार्गदर्शन करण्याचे काम सखी वन स्टॉप सेंटर केंद्रामार्फत करण्यात आले.

अधिकाऱ्यांची नियुक्ती

सखी वन स्टॉप सेंटरमध्ये तक्रार घेऊन आलेल्या महिलेला कायदेविषयक मार्गदर्शन लागत असल्यास एका वकिलाची येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवाय मानसोपचारतज्ज्ञांच्या माध्यमातूनही संबंधित महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाच दिवसांत कारवाई

सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आलेल्या महिलेच्या तक्रारीवर नियमानुसार पाच दिवसांत कारवाई करण्यात येते. असे असले तरी तक्रारींचे स्वरूप पाहून तातडीने यासंदर्भात प्रक्रिया संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे केंद्र महिलांसाठी आधार ठरले आहे.

Web Title: Support of women of Sakhi One Stop Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.