जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू; थांबलेल्या उपचारांना आली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:14 AM2021-07-11T04:14:18+5:302021-07-11T04:14:18+5:30
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रुग्णालय, आर्थो विभाग व सामान्य रुग्णालय, नेत्र रुग्णालयालाही स्वतंत्र शस्त्रक्रियागृह आहे. या चार ...
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रुग्णालय, आर्थो विभाग व सामान्य रुग्णालय, नेत्र रुग्णालयालाही स्वतंत्र शस्त्रक्रियागृह आहे. या चार शस्त्रक्रियागृहांमध्ये जिल्ह्यातील गोरगरीब व सर्व सामान्य रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, मागील काही दिवसांपासून या रुग्णालयाचा कारभार ढेपाळला आहे. जुन्या इमारतीत दोन शस्त्रक्रियागृहे असल्याने बांधकाम विभागाच्या ऑडिटनुसार ही दोन्ही शस्त्रक्रियागृहे बंद करण्यात आली. त्यामुळे ही शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी नवीन जागा मिळत नसल्याने दोन महिने एक शस्त्रक्रियागृह बंद होते. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नेत्र व सामान्य रुग्णालयाचे शस्त्रक्रियागृह पूर्ण बंद राहिले. त्यामुळे आर्थिक फटका सहन करत खासगी रुग्णालयात विविध आजारांवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बंद असलेले शस्त्रक्रियागृह आठ दिवसांपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे पोटाच्या आजारासह इतर विविध आजारांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू झाली असून थांबलेल्या उपचारांना आठ दिवसांपासून गती आल्याचे शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे.
चारही शस्त्रक्रियागृहे सुरू
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण वेगवेगळ्या उपचारांसाठी दाखल होतात. यातील काही रुग्णांवर डोळा, पोटाचे आजार, मणक्याचे आजार, प्रसूती यासह विविध आजारांवर शस्त्रक्रिया कराव्या लागतात. राज्यशासनाने परभणी जिल्ह्यातील या रुग्णालयांवर असणारा रुग्णांचा भार लक्षात घेऊन स्त्री रुग्णालय, आर्थो रुग्णालय, नेत्र रुग्णालय व सामान्य रुग्णालयाला स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उपलब्ध करून दिले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मागील आठ दिवसांपासून पूर्णक्षमतेने ही चारही शस्त्रक्रियागृहे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही लाटेत ओपीडी मात्र सुरू
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. यामध्ये मृत्यूची संख्या ही लक्षणीय आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी ओपीडी बंद केली होती. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेण्याकरता रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला.
जिल्हा रुग्णालयात कोरोनाशिवाय झाले उपचार
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही जिल्हा रुग्णालयात ओपीडी आणि ओटी कक्ष सुरूच होते. सेलू व गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातही कोरोनासह इतरही आजारांवर उपचार सुरू होते. त्याचा फायदा गरिबांना झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही ग्रामीण भागातील लोकांना शासकीय रुग्णालयाचा इतर आजारांसाठी फायदा झाला.