लाचखोरीच्या प्रकरणात फौजदारासह एक पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:26 PM2020-12-03T14:26:20+5:302020-12-03T14:28:30+5:30
पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व पोलीस शिपाई रमेश पांडूरंग मुंढे यांचे निलंबन
- विठ्ठल भिसे
पाथरी : पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना बेकायदेशीर कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्यास सेवेतून निलंबित केल्याचे आदेश 2 डिसेंबर रोजी रात्री उशिरा काढले आहेत.
पाथरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हातील दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके व पोलीस शिपाई रमेश पांडूरंग मुंढे यांनी आरोपींना मदत करण्यासाठी लाचेची मागणी करून मदत केली. तसेच एका प्रकरणात 50 हजाराची लाच स्वीकारली तर दुसऱ्या प्रकरणात बाभळगाव बिटचा संबंध नसताना लाच न दिल्याने आरोपीस कोठडीत टाकले अशा तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याची चौकशी केल्यानंतर कर्तव्यात कसूर, बेशिस्त, बेजबाबदार, अनैतिक व लाचखोर वृत्तीचे वर्तन केल्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या निदर्शनास आले. यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात झाले निलंबन :
पाथरी पोलिसात दाखल ४११ / २०२० गुन्हयामध्ये पोउपनिरीकक्षक टोपाजी कोरके यांनी तक्रारदार आयुब खान वली महम्मद खान रा.फक्राबाद मोहल्ला , पाथरी व त्यांचे ईतर ५ नातेवाईक यांची सदर गुन्हात जमानत होण्याकरीता सहकार्य पाहिजे असल्यास प्रती ईसम रु .२०,००० / -प्रमाणे ६ ईसमांचे रु .१,२०,००० / - आपले मित्र अन्वर अन्सारी यांचे कडे आणून देण्याची मागणी केली. तडजोडी अंती आपले मित्र अन्वर अन्सारी यांचे मार्फत रु .५०,००० / - स्विकारले. यानंतर तक्रारदार यांना जमानत मिळण्यासाठी अडथळे कमी केले. लाचखोरीचे असे गैरकायदेशिर कृत्य करुन जनमानसात पोलीसांची प्रतिमा मलीन केलेली आहे, असा कसुर ठेवत सेवेतून निलंबीत केले आहे.
तर दुसऱ्या एका प्रकरणात पोशि रमेश मुंढे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दाखल एन.सी.क्र .२४ ९ / २०२० या गुन्हयामध्ये ज्ञानेश्वर दिलीपराव कोल्हे रा . उमरा हे दि .१ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ८च्या दरम्यान स्वत : हुन पोस्टे.पाथरी येथे हजर झाले असता त्यांना दिवसभर पोस्टे.ला बसवुन ठेवुन सायंकाळी ७ वाजता जमानत मिळवुन देण्यासाठी तक्रारदार यांना प्रथम रु .१५,००० / ची मागणी केली तक्रारदार हे तयार झाल्याने त्यांची फॉर्मवर सही घेऊन उद्या सकाळी तहसील येथे जमानत करुन देतो म्हणुन म्हटले व नंतर काही वेळाने होमगार्ड केशव दौलतराव मुंढे यांचे मार्फत जमानत करण्यासाठी रु .३०,००० / - ची मागणी केली ' परंतु तक्रारदार हे रु .३०,००० / - एवढी रक्कम देण्यास तयार नसल्याने त्यांना परत अटक करुन रात्रभर पोलीस कोठडीत ठेवत बेकायदेशीर कृत्य केले .विशेष म्हणजे निलंबीत पोलिस कर्मचारी मुंढे यांना बाभळगांव बिट येथे कार्यरत नसतांनाही व सदर गुन्हयाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतांना त्यांनी होमगार्ड केशव दौलतराव मुंढे यांचे मार्फत तक्रारदार यांना रु .३०,००० / ची मागणी केली . यात लाचखोरीचे गैरकायदेशिर कृत्य करुन जनमानसात पोलीसांची प्रतिमा मलीन केलेली आहे असे आदेशात नमुद करत पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ मधील कलम २५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबीत केले आहे.