पाथरी धान्य घोटाळा प्रकरणी गोदाम रक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:40 PM2018-02-21T14:40:51+5:302018-02-21T14:41:26+5:30
शासकीय धान्य वितरणातील माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या 200 पोते धान्य प्रकरणी फरार झालेला पाथरी येथील धान्य गोदामाचा गोदामरक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी परभणी यांनी निलंबित केले आहे.
पाथरी (परभणी ) : शासकीय धान्य वितरणातील माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या 200 पोते धान्य प्रकरणी फरार झालेला पाथरी येथील धान्य गोदामाचा गोदामरक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी परभणी यांनी निलंबित केले आहे. यासोबतच शासकीय धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.
पाथरी तालुक्यातील शिधा दुकानाला धान्य पुरवठा करणारा ठेकेदाराचा टेम्पो 200 पोते गहू तांदूळ आणि साखरेसह माजलगाव पोलिसांनी 13 फेब्रुवारी रोजी माजलगाव शहराजवळ सापळा रचून पकडला होता. या घटनेत 2 दिवसानंतर दोन आरोपी विरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यात आला. यानंतर पकडलेले धान्य पाथरी येथील शासकीय धान्य गोदामातुन उचलले असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. दरम्यान, येथील धान्य गोदाम पाल शेख इम्रान हा धान्याचा टेम्पो पकडला त्या दिवसापासून फरार आहे. दरम्यान, कोणतीही रजा न देता गोदाम रक्षक फरार झाल्याने तहसीलदार यांच्या अहवालावरून जिल्हा पुरवठा विभागाने त्याच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.
ठेकेदाराला नोटीस
शासकीय धान्य वितरणासाठी वापरण्यात येणारे वाहन कोणत्याही शासकीय कार्यालयात न लावता काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्यसाठी वापरण्यात आल्याने धान्य वितरण करण्याऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. यानुसार आपल्यावर दंडात्मक कारवाई का करू नये याचा खुलासा मागविण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मंडवगडे यांनी दिली.
धान्याचे गौडबंगाल सुटेना
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला माल वितरीत करण्यात आलेल्या 14 दुकानाची तपासणी पुरवठा विभागाने केली आहे. यात तफावत आढळली नाही असे पुढे येत आहे. यामुळे येथून आलेला माल कोणाचा याचे कोडे मात्र अद्याप सुटले नाही.
माजलगाव पोलिसांचा पाथरीत तपास
काळ्याबाजारात जाणारे धान्य माजलगाव येथे पकडले असल्याने सध्या अधिक तपासासाठी माजलगाव पोलीस पाथरीमध्ये झाडाझडती घेत आहेत. मात्र, येथे कार्यरत गोदामरक्षकच फरार असल्याने त्यांना अधिक माहिती मिळत नसल्याचे कळते.