फिल्डवरील कर्मचाऱ्याचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:36+5:302021-01-03T04:18:36+5:30
पाथरी : रेणुका शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखाना ...
पाथरी : रेणुका शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कारखाना प्रशासनाने फिल्डवर सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.
पाथरी येथील रेणुका शुगर साखर कारखान्याच्या ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेच्या मनमानी कारभारात फिल्डवरील कर्मचाऱ्याची पाठराखण प्रशासनाकडून केली जात होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत होती. कारखाना सुरू होऊन ६४ दिवस उलटले आहेत. या काळात ऊस तोडणीसाठी ठरवून दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत नसल्याने एकाला तोड चिठ्ठी आणि दुसऱ्याच्या शेतातील ऊस तोडणीचा प्रकार सातत्याने मागील काही दिवसांपासून उघड होत होता. त्यामुळे ऊस उत्पादकांतून कारखाना प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट न थांबविल्यास ६ जानेवारी रोजी काटाबंद करून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाकडून तोडणी आणि वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारखाना प्रशासनाने फिल्डवरील कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एकाचे निलंबन करून प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
युनिट हेड आणि पथकाकडून तक्रारीची शहानिशा
कारखाना तोडणी आणि वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कारखाना युनिट हेड आणि इतर अधिकाऱ्यांमार्फत उसाच्या फडात जाऊन थेट सर्वेक्षण केले जात आहे. यात एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली.
फिल्डवर काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला दोषी आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणावरून हटविण्यात यावे, तसेच यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, यासाठी ६ जानेवारी रोजी काटा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आ. बाबाजानी दुर्राणी