सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 03:59 PM2018-12-26T15:59:47+5:302018-12-26T16:00:40+5:30
टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़
परभणी : दुष्काळी परिस्थितीमध्ये टोमॅटोला किरकोळ भाव मिळत असल्याने आणि शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याने बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़ शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात दुपारी साधारणत: २़४५ च्या सुमारास ही घटना घडली़
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बुधवारी परभणी येथे आले होते़ विद्यापीठातील हा समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली़ या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगांबर पवार, केशव आरमळ, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोढे, उस्मान पठाण आदींसह इतर कार्यकर्ते उड्डाणपुलाजवळ सुरुवातीपासूनच थांबले होते.
परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, रबीचा हंगाम वाया गेला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारा भाजीपाला पिकविला़ मात्र भाजीपाल्यालाही भाव मिळत नाही़ टोमॅटोलाही अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ या शिवाय जिल्ह्यात दुष्काळी योजनांना सुरुवात झाली नाही़ या कारणांवरून कृषी राज्यमंत्री आणि शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलालगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनासमोर टोमॅटो फेकून रोष व्यक्त केला़ यावेळी पोलीस बंदोबस्तही होता़ परंतु, अचानक झालेल्या या प्रकारामुळे काहीसा गोंधळ उडाला आणि त्याच परिस्थिती खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला़