शेत आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला, ४० तोळे चांदी लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 01:34 PM2021-12-30T13:34:52+5:302021-12-30T13:37:15+5:30
पोलिसांनी पालम परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
गंगाखेड ( परभणी ) : गंगाखेड येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चाटोरी रोडलगत असलेल्या शेत आख्याड्यावर गुरुवारी पहाटे १ वाजता दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. चार सशस्त्र दरोडेखोरांनी शेत आखाड्यावर झोपलेल्या अंबादास भिवराजी ठवरे ( ५५ वर्ष रा.आनंदवाडी, तालुका पालम ) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. आखाड्यावरील महिलांच्या अंगावरील ४० तोळ्यांचे चादीचे दागीने लुटून दरोडेखोरांनी पलायन केले.
आनंदवाडी येथिल चाटोरी रोडवर अंबादास भिवाजी ठवरे यांचा आखाडा आहे. बुधवारी रात्री अंबादास, पत्नी पुष्पाबाई आणि नात जान्हवी यांच्यासोबत आखाड्यावर झोपले होते. पहाटे १ वाजता बर्मुडा घातलेले चार दरोडेखोर हातात कुऱ्हाडी घेऊन आखाड्यावर घुसले. दरोडेखोरांनी झोपेत असलेल्या अंबादास ठवरे यांच्यावर कुऱ्हाडीने घाव करत गंभीर जखमी केले. त्यानंतर पुष्पाबाई यांच्या अंगावरील ४० तोळ्याचे चांदीचे दागीने, सोन्याची पोत व कानातील दागिना असा ७० हजाराचा ऐवज काढून घेत पलायन केले.
गंभीर जखमी अंबादास यांच्यावर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून अधिक उपचार परभणी येथे सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्यातील पो.नी.काकडे, पीएसआय विनोद साने, एएसआय राठोड, हे.काॅ.येवते तसेच श्वानपथकाचे एपीआय मोहमद पठाण, पो.काॅ.बबन शिदे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी पालम परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.