ग्रामपंचायतीच्या राजकारणात तरुणांचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:43+5:302021-01-22T04:16:43+5:30
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांविषयी चर्चा होऊ लागली आहे. राजकारणाचा कोणताही ...
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. त्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांविषयी चर्चा होऊ लागली आहे. राजकारणाचा कोणताही वारसा नसलेले व नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या काही उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळविला आहे. पालम तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत विद्या भास्कर लांडे या २२ वर्षाच्या विवाहित तरुणीने बी.एस्सी.चे शिक्षण घेतल्यानंतर निवडणूक लढविली व त्यात बिनविरोध निवड झाली. गावाच्या सर्वांगिन विकासासाठी काम करण्याचा विद्याचा निर्धार असून सुशिक्षत बेरोजगारांसाठी लघु उद्योग आणण्यासह शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्याने सांगितले. सेलू तालुक्यातील खेर्डा येथील प्रियंका विकास आठवले या २४ वर्षीय तरुणीनेही आरक्षित जागेवरुन निवडणूक लढविली आणि त्यात यश संपादन केले. गावातील तरुणांसाठी वाचनालय स्थापन करुन त्यांना रोजगाराभिमूख माहिती उपलब्ध करुन देण्याचा प्रियंकाचा मानस आहे. निरवाडी येथील अनिल वांढेकर या २४ या तरुणानेही या निवडणुकीत विजय मिळविला. अनिलचे चुलते यापूर्वी राजकारणात होते. त्यांच्याकडून राजकाराणाचे धडे घेऊन आता अनिलला गावातील मुलभूत समस्या सोडवायच्या आहेत.
पाथरी तालुक्यातील गौंडगाव येथील प्रमोद नारायण हारकळ या २१ वर्षीय तरुणानेही निवडणुकीत विजय मिळविला. प्रमोदला गावात स्वच्छता अभियान राबवून शुद्ध पाणीपुरवठा ग्रामस्थांना द्यायचा आहे. गावात वाचनालय, व्यायामशाळा आदींची उभारणीही करण्याचा त्याचा मानस आहे. बाभळगाव येथील भूवन सुनील नाईकवाडे या २४ वर्षीय तरुणानेही विजय मिळविला. त्याला गावात प्रत्येक रस्त्यावर वृक्षारोपण करुन गाव हरित करायचे आहे. शिवाय हगणदारी मुक्त गाव करुन तरुणांना रोजगार उपलब्ध करुन द्यायचा आहे. किन्होळा खु. येथील शुभम राधाकिशन कणसे या २२ वर्षीय तरुणानेही निवडणुकीत विजय मिळविला. त्यालाही गावात आरोग्य व शैक्षिणक सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या आहेत. मानवत तालुक्यातील किन्होळ बु. येथील माधुरी मदनराव कदम या २५वर्षीय तरुणीने विजय मिळविला. माधुरीचे आजोबा मुंजाजी भाले पाटील पाथरीचे नगराध्यक्ष होते. ते १५ वर्षे गावचे सरपंच होते. त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन माधुरीने गावाच्या विकासात आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
बचतगटातून ग्रा.पं. राजकारणात
जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील वंदना महेंद्र लाटे या २५ वर्षीय तरुणीने बचतगटाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. गावाचा विकास करण्याच्या हेतुने ग्रामपंचायत निवडणूक लढविली आणि त्यात विजय संपादन केला. गावामध्ये प्रत्येक घरी शौचालय उभारण्याचा वंदनाचा मानस आहे. याशिवाय गावात दुग्धपालन, कुकुटपालन आदी रोजगार देणारे व्यवसाय सुरु करण्याची त्यांची ईच्छा आहे.
सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील बाबासाहेब हरिभाऊ ताल्डे, डिघोळ येथील वैभव विजय खंदारे यांनीही या निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यांनाही गावाचा विकास करायचा आहे.