गोदावरी पात्रात पोहणे जीवावर बेतले; पाथरीत दोन बालकांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:35 PM2020-05-22T19:35:49+5:302020-05-22T19:36:30+5:30
इतर मुलांनी आरडाओरड केली, गावातील नागरिक येईपर्यंत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.
पाथरी ( परभणी ) : तालुक्यातील मरडसगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 22 मे रोजी दुपारी घडली. आशिष भिकू साळवे ( 12 ) आणि मेहुल सुधाकर लोखंडे ( 8 ) अशी मृतांची नावे आहेत.
पाथरी तालुक्यातील ढलेगाव च्या उच्च पातळीच्या बंधाऱ्याचे बॅक वॉटरचे पाणी मरडसगावच्या शिवराच्या पलीकडे आहे ,सध्या पात्रात पाणी असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात या गावातील तरुण रोज पोहण्यासाठी जातात . शुक्रवारी सकाळी 11 वाजता इतर मुला सोबत आशिष आणि मेहुल हे दोघेही पोहण्यास गेले होते.मात्र पात्रातील एका खड्यात ते पाय घसरून पडले, त्यात दोन्ही बालके बुडाली. इतर मुलांनी आरडाओरड केली, गावातील नागरिक येईपर्यंत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. आशिष हा सातव्या वर्गात शिकत होता तर मेहुल हा चौथ्या वर्गात शिकत होता. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.