दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपाय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:47 AM2021-02-20T04:47:37+5:302021-02-20T04:47:37+5:30
परभणी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही शक्यता लक्षात घेता, चाचण्या वाढविणे, कॉन्टॅक्ट ...
परभणी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही शक्यता लक्षात घेता, चाचण्या वाढविणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे यांसह पुरेसा औषधी साठा, खासगी व्यावसायिकांशी संवाद साधून उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक जयंत मीना, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, महापालिकेचे आयुक्त देवीदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून कोरोनाचा आतापर्यंतच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुगळीकर म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी करावी. जिल्ह्यातील औषधींचा साठा वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधून हॉस्पिटलच्या तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच सर्दी, खोकला असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आरटीपीसीआर तपासणी करा; ताप, सर्दी, खोकला झाल्यास अनेकजण थेट औषधी दुकानांतून औषधी घेतात. अशा रुग्णांच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश औषधी विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय आर.टी.पी.सी.आर.च्या तपासण्या वाढवा, एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची यादी तयार करून त्यांच्या तपासण्या करून घेण्याच्या सूचना मुगळीकर यांनी दिल्या.
या बैठकीस आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, विभागप्रमुख, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, निमा, आयुर्वेद आणि होमिओपॅथी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरटीपीसीआरसाठी पथके, समन्वयकांची नियुक्ती
जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढविण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पथकासाठी समन्वयकांची नियुक्ती केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. पथके अशी (कंसात समन्वयक) : सर्व तहसील कार्यालये, नगरपालिका (तहसीलदार), कृषी उत्पन्न बाजार समिती (जिल्हा उपनिबंधक), सर्व बसस्थानक (विभागीय नियंत्रक), महानगरपालिका (उपायुक्त प्रदीप जगताप), किरकोळ व्यापाऱ्यांची तपासणी (उपायुक्त, महापालिका, मुख्याधिकारी नगरपालिका), जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व शासकीय कार्यालये (उपायुक्त प्रदीप जगताप), सर्व मंगल कार्यालये, लॉन्स, फंक्शन हॉल (उपायुक्त,महापालिका), जिल्हा प्रवेश हद्द (एआरटीओ), रेल्वेस्थानक (उपायुक्त, रेल्वे व्यवस्थापक, पोलीस निरीक्षक, रेल्वे), जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, खासगी दवाखाने, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे.