संसार उध्वस्त होतोय साहेब कारवाई करा; दारू बंदीसाठी कासापुरी येथील महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:44 PM2018-09-05T17:44:46+5:302018-09-05T18:05:08+5:30
महिलांनी थेट पाथरी पोलीस ठाणे गाठून, 'साहेब आमचे संसार उध्वस्त झालेत आता तरी कारवाई करा' अशी मागणी केली.
पाथरी (परभणी ) : कासापुरी येथे अवैध दारू विक्री वर कारवाई होत नसल्याने अवैध दारू विक्रेत्याचे मनोधेर्य वाढले आहे. आता तर खुलेआम हा धंदा सुरू असल्याने गावातील महिला चांगल्या च वैतागल्या आहेत. यामुळे त्यांनी आज थेट पाथरी पोलीस ठाणे गाठून, 'साहेब आमचे संसार उध्वस्त झालेत आता तरी कारवाई करा' अशी मागणी केली.
तालुक्यातील कासापुरी हे ३ हजार पेक्षा अधिक लोकसंख्येचे गाव आहे. गावात काही महिन्यांपासून दारूची खुलेआम विक्री सुरु आहे. एकूण ३ ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने गावात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे अनेक महिलांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
महिलांनी याबाबत ३ वेळा पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, दारूविक्री बंद झाली नाही. आज गावातील महिलांनी थेट पाथरी येथील पोलीस ठाणे गाठले व सहायक पोलीस निरीक्षक के बी बोधगिरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, ' 'साहेब आमचे संसार उध्वस्त झालेत आता तरी कारवाई करा' अशी विनवणी केली. पोलिसांना दिलेल्या निवेदनावर संगीता वैराळे, रेखा वैराळे, विजयमास वैराळे, द्रौपदी वैराळे, मंगल साबळे, लता वैराळे, सुरेखा वैराळे, निमा वैराके आदींच्या स्वाक्षरी आहेत.