आई-वडिलांना सांभाळ करा, अन्यथा शासकीय योजनेला विसरा; खांबेगाव ग्रामपंचायतीचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:01 IST2025-01-14T17:01:45+5:302025-01-14T17:01:59+5:30

पूर्णा तालुक्यातील खांबेगाव ग्रामपंचायतीने घेतला ठराव

Take care of your parents, otherwise forget about the government scheme; Khambegaon Gram Panchayat resolution | आई-वडिलांना सांभाळ करा, अन्यथा शासकीय योजनेला विसरा; खांबेगाव ग्रामपंचायतीचा ठराव

आई-वडिलांना सांभाळ करा, अन्यथा शासकीय योजनेला विसरा; खांबेगाव ग्रामपंचायतीचा ठराव

ताडकळस (जि. परभणी) : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न देण्याचा पूर्णा तालुक्यातील खांबेगाव ग्रामपंचायतीने ठराव घेत इतर ग्रामपंचायतीसमोर आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीच्या या महत्त्वपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या ठरावाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचे आपल्या जन्मदात्यांकडे दुर्लक्ष होते. आयुष्यभर ज्यांनी कष्ट करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आज त्यांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांना जाणीव व्हावी, यासाठी पूर्णा तालुक्यातील खांबेगावात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी माँ जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श ठेवत ग्रामसभेत आई-वडिलांना सांभाळ न करणारे शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नसल्याचा ठराव घेतला. या ठरावाचे सर्वांनीच स्वागत केले. यावेळी सरपंच मुक्ता कदम, ग्रामसेविका संगीता ससाणे, गजानन कदम सह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान ग्रामपंचायतीच्या ठरावाची चर्चा तालुक्यात झाल्याने सर्वांनीच ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

इतरही महत्त्वपूर्ण निर्णय
या सभेत २०२५-२६ ग्रामपंचायत जीडीपीडी आराखडा, प्रधानमंत्री आवास योजना नोंदणीचे यादीचे वाचन करण्यात आले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, गावातील धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही लावणे, महिलांना रस्त्यावर वावरताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अंगणवाडी मंदिर समाज मंदिर व मशीद परिसरात घाण करू नये तसेच आढळून आल्यास ग्रामपंचायत योजनेचा लाभ घेता येणार नाही आदी विषयावर ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी लवकरात लवकर या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सरपंच मुक्ता कदम यांनी सांगितले.

बालविवाह बद्दलही घेतले कठोर निर्णय
२०२३ मध्ये बालविवाह रोखण्यासाठी सरपंच मुक्ता गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतने बालविवाह होणार नाही. यासाठी ठराव मंजूर करून विशेष काळजी घेतली होती. याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सरपंच मुक्ता गजानन कदम व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला होता.

Web Title: Take care of your parents, otherwise forget about the government scheme; Khambegaon Gram Panchayat resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.