शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी माळीवाडा सज्जाचे तलाठी नागरगोजे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:15 PM2019-07-24T16:15:38+5:302019-07-24T16:16:20+5:30
सातबारा उताऱ्यावरून नाव गायब झाल्याच्या धक्क्यातून शेतकऱ्याचा झाला होता मृत्यू
पाथरी (परभणी ) : शेतीच्या सातबारा उताऱ्यावरून नाव गायब झाल्याने प्रधानमंत्री किसान पीक विमा भरता येत नसल्यामुळे तुरा येथील शेतकऱ्याचा सज्जावरच हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणात माळीवाडा सज्जाचे तलाठी व्ही पी नागरगोजे यांना उपजिल्हाधिकारी पाथरी यांनी निलंबित केले आहे.
सातबाऱ्यावरून नाव गायब झाले; दुरुस्तीसाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयात मृत्यू
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक विमा भरण्यासाठी ऑनलाइन 7 बारा उतारा आवश्यक आहे , त्या साठी तलाठी कार्यालयात मागील काही दिवसात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक यांची गट no 131 मधील 71 आर शेती ऑनलाइन 7 बारा उतार्यावरून गायब झाल्याने ते विमा भरण्यासाठी 7 बारा उतारा काढण्यासाठी रोज चकरा मारत होते मात्र 7 बारा दुरुस्ती न झाल्याने अस्वस्थ अवस्थेत 23 जुले रोजी तलाठी व्ही पी नागरगोजे यांच्या पाथरी येथील सज्जावर त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शासकीय यंत्रणा जबाबदार असून त्यांच्यवर कारवाई झाल्याशिवाय आणि मदत मिळाल्याशिवाय प्रेत न हलवण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी कारवाई चे आश्वासन दिल्यानंतर प्रेत गावी नेण्यात आले.
दरम्यान या प्रकरणी उपजिल्हाधिकारी पाथरी व्ही एल कोळी यांनी तलाठी व्ही पी नागरगोजे यांना जमीन महसूल अधिनियम 166 चे कलम 155 चे तुरा येथील शेतकऱ्याचे प्रकरण विहित मुदतीत दाखल न केल्याचा ठपका ठेवत 24 जुले रोजी निलंबित केले.