जमिनीच्या फेरफारसाठी तलाठ्याने घेतली ४० हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 08:07 PM2024-08-01T20:07:50+5:302024-08-01T20:08:12+5:30
परभणीच्या एसीबी पथकाची कारवाई, गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू
परभणी/ताडकळस : तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीचे फेरफार करून सातबारावर नोंद घेण्यासाठी तलाठ्याने ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच मागणी पडताळणीमध्ये ही बाब समोर आल्यानंतर पंचासमक्ष गुरुवारी सापळा कारवाई करण्यात आली. यामध्ये आरोपी लोकसेवक तलाठी दत्ता होणमाने यांनी तक्रारदार यांच्याकडून ४० हजारांची लाच रक्कम स्वीकारली. या प्रकरणी पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.
दत्ता संतराम होणमाने, तलाठी, सज्जा फुलकळस ता.पूर्णा असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे फुलकळस शिवारात एकूण दोन गुंठे जमीन विकत घेतली आहे. बँक कामासाठी जमिनीचा फेरफार करून सातबारावर नोंद घेणे आवश्यक असल्याने त्यासाठी ५ जुलै रोजी तक्रारदार यांनी तलाठी दत्ता होणमाने यांची भेट घेतली व कागदपत्रे देऊन फेरफारसाठी विनंती केली. २२ जुलैला तक्रारदार होणमाने यांना फेरफारच्या कामासाठी भेटले असता तलाठी होणमाने यांनी तक्रारदार यांना प्रती गुंठा ४० हजारप्रमाणे फेरफारचे कामासाठी एकूण ८० हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली. याबाबत एसीबी कार्यालयात तक्रारदाराने २९ जुलैला तक्रार दिली.
गुरुवारी पंचासमक्ष केलेल्या लाचमागणी पडताळणी दरम्यान तलाठी दत्ता होणमाने यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण ८० हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार लगेच आणून देण्यास सांगितले. त्यावरून पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे होणमाने यांनी तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये लाच रक्कम स्विकारली. तलाठी दत्ता होणमाने यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. यामध्ये ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे तपास करीत आहेत.