नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन जाणार बांधावर; पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले निर्देश                               

By मारोती जुंबडे | Published: October 16, 2022 06:49 PM2022-10-16T18:49:16+5:302022-10-16T18:49:47+5:30

नुकसान भरपाईसाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आहे.

Tanaji Sawant directed that the administration will go to the farmers' fields for compensation   | नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन जाणार बांधावर; पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले निर्देश                               

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन जाणार बांधावर; पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले निर्देश                               

Next

परभणी: जिल्ह्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील सखल भागात पाणी साचल्याने पीक वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग यांना तात्काळ जायमोक्यावर जाऊन पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर दिसणार आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात कमी अधिक पावसावर सोयाबीन व कापूस ही पिके वाढवली. फवारणी, खते यासाठी मोठा खर्च केला. विशेष म्हणजे आता तोंडाशी आलेली सोयाबीनची काढणी सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. तर कापूस पिकाला बोंडे फुटले आहेत. 

शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांमधून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र जिल्ह्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवस परतीचा पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाबरोबर वारे सुटल्याने कापूस पीक हे भुईसपाट झाले आहे. जुलैमध्ये अतिवृष्टी, ऑगस्ट महिन्यात सलग २१ दिवस कोरडा गेला आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी बळीराजातून होत होती. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पंचनाम्यांच्या प्रक्रियेतून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये, याचीही दक्षता घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी  आंचल गोयल यांना दिले आहेत. याप्रमाणे महसूल विभाग व कृषी विभाग यांनी समन्वयाने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनो नुकसानीची पूर्वसूचना द्या
सद्याच्या स्थितीत सोयाबीन पिकाच्या काढणीस सुरुवात झालेली आहे. तसेच तूर व कपाशी शेतात वाढीच्या अवस्थेत आहे. या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अधिसूचित पिकांबाबत नुकसानभरपाई लागू आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास पूर्वसूचना देण्याचे आवाहन  पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे. 

इथे करा तक्रार
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. जिल्ह्यामध्ये पीक विमाधारक शेतकऱ्यांचे सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲपवर, टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ वर कॉल करून किंवा customersupport@icicilombard.com या ईमेल वर आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना पीक विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे.

 शुक्रवारी या मंडळात अतिवृष्टी

  1.   परभणी ........................ ७३
  2.  पेडगाव........................ ८१
  3.   जांब...........................८१
  4.   पिंगळी ......................६७
  5.   पूर्णा.........................७६
  6.   कात्नेश्वर...................६६ 


 

Web Title: Tanaji Sawant directed that the administration will go to the farmers' fields for compensation  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.