या शिक्षकाच्या हातात आहे कला; रंगीत खडूंच्या सहाय्याने बोर्डवरच रेखाटले शिवरायांचे लक्षवेधक चित्र
By सुमेध उघडे | Published: February 19, 2019 05:46 PM2019-02-19T17:46:32+5:302019-02-19T17:57:19+5:30
शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त बोर्डवर रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
- सुमेध उघडे
औरंगाबाद /परभणी : शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र पाथरी तालुक्यातील माळीवाड्याच्या जिल्हा परिषदच्या आंतरराष्ट्रीय शाळेत एक शिक्षक याच काळ्या फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने लक्षवेधक चित्र रेखाटतात. पंकज बिरादार असे या शिक्षकाचे नाव आहे. मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने शिवाजी महाराजांचे जयंतीनिमित्त त्यांनी रेखाटलेले चित्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. यात पंकज बिरादार मागील वर्षभरापासून कार्यरत आहेत. मुळचे उदगीर तालुक्यातील बिरादार यांना चित्रकलेची आवड आहे. मात्र त्यांनी याचे कुठेही शिक्षण घेतले नाही. शाळेत 'फलक लेखन' असा शिक्षकांच्या कार्याचा एक भाग असतो. यातूनच त्यांनी बोर्डवर रंगीत खडूंच्या सहाय्याने चित्र रेखाटन सुरु केले. विद्यार्थ्यांना दिनविशेष समजावून सांगण्यात त्यांच्या या चित्रांची मोठी मदत होत आहे. आकर्षक रंगसंगतीत रेखाटलेली ही चित्रे शिक्षकांच्या वर्तुळात चर्चेची ठरली. यातूनच त्यांची रेखाटने सोशल मीडियातून व्हायरल झाली. अंक आणि अक्षरांशिवाय काळ्या फळ्यावरची ही आकर्षक रेखाटने सध्या चर्चेची ठरत आहेत.
पुण्यावरून मागवतात विशेष खडू
रेखाटन करण्यासाठी लागणारी रंगीत खडू परभणी जिल्ह्यात उपलब्ध होत नाहीत. यामुळे बिरादार ही खडू पुण्यातून मागवतात. आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांनी याच खडूंच्या सहाय्याने शुभेच्छा चित्र रेखाटले आहे. हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांना अडीज तासाचा अवधी लागला. शिव जयंती असल्याने त्यांचे हे चित्र लागलीच व्हायरल झाले. यासोबतच त्यांनी नुकताच झालेला पुलवामा येथील दहशवादी हल्ला, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला आदी विषयावरील सुरेख चित्रे रेखाटली आहेत.
राज्यमंत्री खोत झाले प्रभावित
काही दिवसांपूर्वी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शाळेस भेट दिली. यावेळी बिरादार यांनी त्यांच्या समक्षच केवळ १० मिनिटात खडूच्या सहाय्याने त्यांचे चित्र रेखाटले. यामुळे प्रभावित झालेल्या खोत यांनी त्यांचे कौतुक केले.
छंद म्हणून जोपसना
शाळेत 'फलक लेखन' या प्रकारातून मला रेखाटन करण्याचा छंद जडला. यातूनच रंगीत खडूंच्या सहाय्याने मी दिनविशेष वेगळ्या पध्दतीने रेखाटने सुरु केले. येथे येताच शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षकांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले. यामुळे माझ्या छंदाची जोपासना होतेच शिवाय विद्यार्थ्यांना एका वेगळ्या कलेची ओळखही होते.
- पंकज बिरादार, प्राथमिक शिक्षक, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा